
मी, दोन दिवसांमध्ये राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे, असे कवी मनाचे नेते आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुणेः मी, दोन दिवसांमध्ये राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे, असे कवी मनाचे नेते आणि बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील चर्चित स्पर्धक अभिजीत बिचुकले यांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वरळी मतदार संघातून बिचुकले यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभावाला सामोरे जावे लागले. बिचुकले यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, 'या पत्राद्वारे सध्या नवनिर्वाचित असलेल्या स्वाभिमानी, होतकरू, शिवप्रेमी तसेच समाजासाठी विशेष कार्य करण्याची जिद्द असलेल्या आमदार बंधू-भगिनींना जाहिर आवाहन करतो की, आपण मला सर्वांनी जात, धर्म व पक्ष बाजूला ठेवून मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा द्यावा. माझ्या मंत्रिमंडळामध्ये योग्य मंत्रिपदावर विराजमान व्हावे. इतर पक्षांनी व त्यांच्या प्रमुखांनी स्वतःचे कसे व किती वेळे भले करून घेतले आहे, हे तुम्हाला माहित असेलच. तेंव्हा अशा स्वार्थी पक्षप्रमुखांच्या नादाला लागण्यापेक्षा माझ्या बरोबर यावे, हिच अपेक्षा. मी, येणाऱया दोन दिवसांत मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे.'
बिचुकले यांचे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. परंतु, हे पत्र व त्यावरील स्वाक्षरी बिचुकले यांचीच आहे का? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिवाय, या पत्रावर तारीख नसल्याने ते कधी व्हायरल झाले, याबाबतही माहिती नाही.
दरम्यान, राज्यपालांनी सत्ता स्थापनेसाठी तिसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यांची मुदत आज (मंगळवार) रात्री साडे आठ वाजता संपत आहे. त्यापूर्वीच राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानंतर राष्ट्रपती राम नाथ कोविन यांच्याकडून आता या शिफारसीवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची ही तिसरी वेळ आहे.