शैक्षणिक वर्ष संपले, तरीही मिळेना शिष्यवृत्ती

तात्या लांडगे
रविवार, 30 जून 2019

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या पैशातून आगामी शैक्षणिक वर्षाची फी भरता येईल म्हणून समाजकल्याण कार्यालयाचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

सोलापूर : मागासवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात टिकावेत अन्‌ त्यांना शिक्षणासाठी अर्थसाह्य मिळावे, या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या शिष्यवृत्तींच्या माध्यमातून मदत केली जाते.

मागच्या वर्षी या शिष्यवृत्तींसाठी राज्यातून चार लाख 39 हजार 375 विद्यार्थ्यांनी अर्ज केले. आता नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले, तरीही अद्याप एक लाख 8 हजार 342 विद्यार्थ्यांना 199 कोटी रुपयांची प्रतीक्षाच करावी लागत असल्याची माहिती समाजकल्याण विभागाच्या सूत्रांनी दिली. 

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्री शिप, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता दिला जातो. त्यासाठी दरवर्षी सरासरी साडेचार लाख विद्यार्थी अर्ज करतात. यंदा त्यामध्ये मोठे काम झाले असले, तरीही वर्षानंतरही एक लाख आठ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळालेली नाही.

दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसामान्य कुटुंबातील अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या पैशातून आगामी शैक्षणिक वर्षाची फी भरता येईल म्हणून समाजकल्याण कार्यालयाचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र पाहायला मिळते. लवकरच पैसे जमा होतील, असे उत्तर त्यांना दिले जात आहे. वास्तविक, अर्ज केल्यापासून तीन महिन्यांत शिष्यवृत्ती मिळावी अशा या योजना आहेत. मात्र, मनुष्यबळाअभावी त्याची अंमलबजावणी होत नसल्याचेही सूत्रांनी सांगितले. 

राज्याची स्थिती :

अर्जदार विद्यार्थी  4,39,375 
पात्र विद्यार्थी  4,20,507 
अनुदानास पात्र विद्यार्थी 4,16,893 
अनुदान मंजूर  1150.12 कोटी 
अनुदान वितरित 950.76 कोटी 

मागच्या वर्षी राज्यभरातून चार लाख 39 हजार 375 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी चार लाख 3 हजार 33 विद्यार्थ्यांसाठी एक हजार 150 कोटी 12 लाखांचे अनुदान मंजूर झाले असून, त्यापैकी 950 कोटी 76 लाख रुपये वितरित केले आहेत. 
- मिलिंद शंभरकर, आयुक्‍त, समाजकल्याण, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Academic year has ended still scholarship is not available