मुंबई-पुणे महामार्गावरील अपघातांमुळे वाहतूक विस्कळीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (शुक्रवार) झालेल्या दोन स्वतंत्र अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र काही काळाने वाहतूक पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे.

मुंबई - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज (शुक्रवार) झालेल्या दोन स्वतंत्र अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र काही काळाने वाहतूक पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे.

एका अपघातात द्रुतगती मार्गावर मळवलीजवळील बोरज गावच्या हद्दीत टेंपोने कंटेनरला मागून धडक दिल. त्यामध्ये टेंपो आणि कंटेनर दोन्हीही वाहने जळून खाक झाली. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याकडे सौंदर्य प्रसाधने आणि अन्य काही साहीत्य घेऊन येणाऱ्या टेंपोने बोरजजवळ द्रुतगती मागार्लगत उभ्या असलेल्या कंटेनरला जोरात धडक दिली. या अपघातानंतर दोन्ही वाहनांनी अचानक पेट घेतला. दोन्ही वाहनांमधील चालकांनी प्रसंगावधान राखत गाडीबाहेर उडया मारल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच आयआरबी कंपनीचे कमर्चारी, डेल्टा फोर्स, देवदूत यंत्रणा, पोलिस कमर्चारी घटनास्थळी दाखल झाले. आयएनएस शिवाजी, आयआरबी कंपनी, लोणावळा नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबानी दोन्ही वाहनांना लागलेली आग विझवली. मात्र तोपर्यंत दोन्ही वाहने जळून खाक झाली होती. दरम्यान द्रुतगतीवरील वाहतुक पाच तास विस्कळीत झाली होती. द्रुतगतीवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.

तर अन्य एका अपघातात महामागार्वर बोरघाटात अमृतांजन पुलाच्या पुढे अवजड क्षमतेची क्रेन उलटली. त्यामुळे वाहतूक बराच वेळ विस्कळीत झाली. बोरघाट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमृतांजन पुलाजवळील तीव्र उतार व वळणामुळे क्रेनचालकाला नियंत्रण राखता न आल्याने क्रेन रस्ता दुभाजकास धडकून द्रुतगती मागार्वर उलटला. यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतुक तासभर विस्कळीत झाली होती. द्रुतगती मागार्वर अपघाताच्या दोन घटनांमुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने आजचा शुक्रवार हा द्रुतगतीवरील वाहतुक कोंडीचा शुक्रवार ठरल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र त्यानंतर वाहतूक जुन्या महामार्गाने वळविण्यात आली आणि त्यानंतर काही काळातच वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Web Title: Accident on Mumbai-Pune highway