‘ब्लॅक स्पॉट’ वाढले

मंगेश सौंदाळकर
सोमवार, 7 मे 2018

मुंबई - राज्यातील रस्त्यांवरील अपघातात रोज सरासरी ३७ जणांचा मृत्यू होत असतानाच राज्यातील ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणजे अपघातप्रवण क्षेत्रात ५०० नव्या ठिकाणांची भर पडली आहे.

मुंबई - राज्यातील रस्त्यांवरील अपघातात रोज सरासरी ३७ जणांचा मृत्यू होत असतानाच राज्यातील ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणजे अपघातप्रवण क्षेत्रात ५०० नव्या ठिकाणांची भर पडली आहे.

गेल्या वर्षी राज्यात ७४२ ब्लॅक स्पॉट होते, तर या वर्षी महामार्ग पोलिसांनी १२७५ ‘ब्लॅक स्पॉट’ची नोंद केली आहे. यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे १०१ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत, तर अकोला जिल्ह्यात एकही ‘ब्लॅक स्पॉट’ नाही.राज्याच्या रस्त्यांवर दररोज १५ लाख वाहानांची ये-जा असते. पावसाळ्याच्या काळात अपघातांचा धोका वाढत असल्याने त्यापूर्वी सर्वेक्षण करून महामार्ग पोलिस ‘ब्लॅक स्पॉट’ ठरवतात. नाशिक शहरातून मुंबई - आग्रा आणि नाशिक-पुणे महामार्ग, नाशिक-औरंगाबाद राज्यमार्ग असे तीन मोठे रस्ते जातात. तर त्र्यंबक रोड, जुना आग्रा महामार्ग येथे नेहमीच अपघात होत असतात. 

‘ब्लॅक स्पॉट’चा आढावा घेत उपाययोजना करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्याचे गृहविभागातील अधिकाऱ्याने सांगितले. हे धोकादायक भाग रस्ता रुंदीकरण अथवा इतर उपाय करून सुरक्षित करण्याचा विचार बांधकाम विभागामार्फत केला जात आहे.

असा ठरतो ब्लॅक स्पॉट 
जिल्हा, राज्य, राष्ट्रीय महामार्गावर पाच गंभीर अपघात किंवा अपघातात दहा व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्याचा आढावा घेतला जातो. आढावा घेऊन त्या ठिकाणाला ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ठरवले जाते. दर तीन महिन्यांनी त्या ‘ब्लॅक स्पॉट’चा आढावा पोलिस घेतात. 

नाशिकमध्ये सर्वाधिक
गेल्या तीन वर्षांत ३८ हजार मृत्यू
1.7 लाख जखमी 

ब्लॅक स्पॉट 
६०३ - राष्ट्रीय महामार्ग
२९२ - राज्य महामार्ग
११ - एक्‍स्प्रेस वे 
३६९ - इतर मार्गांवर

Web Title: Accidental spot increase in maharashtra