अफवा पसरविणाऱ्यांना सरकारकडून कारवाईचा डोस- जिल्हा शल्यचिकित्सक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

गोवर आणि रुबेला या रोगांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने लसीकरण केले जात आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नसून, ऍलर्जी झाल्यास त्यावर तत्काळ उपाय करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविलेल्या अफवांमुळे या मोहिमेला बाधा येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने अशी माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले असून, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांनी दिली.
 

सोलापूर : गोवर आणि रुबेला या रोगांचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने लसीकरण केले जात आहे. याचे कोणतेही दुष्परिणाम होत नसून, ऍलर्जी झाल्यास त्यावर तत्काळ उपाय करण्याची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे. परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरविलेल्या अफवांमुळे या मोहिमेला बाधा येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सरकारने अशी माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले असून, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांनी दिली.

राज्यात पहिल्या टप्प्यात शालेय विद्यार्थ्यांना लसीकरण केले जात असून, त्यानंतर शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील 25 हजार विद्यार्थ्यांना गोवर-रुबेलाची लस देण्यात आली आहे. परंतु, काही शाळांमधील विद्यार्थी अथवा त्यांच्या पालकांमध्ये गैरसमज असून, काहीजण लसीकरणादिवशी आपल्या मुलांना शाळेत पाठवित नसल्याचेही दिसून आले आहे. मात्र, या लसीकरणाचे कोणतेही विपरीत परिणाम होत नाहीत, असे पालकांसह विद्यार्थ्यांना वारंवार सांगावे लागत आहे. भविष्यात गोवर अथवा रुबेला आजार होऊ नये, यासाठी हे लसीकरण गरजेचे असून, अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन डॉ. अंदूरकर यांनी केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांना गोवर व रुबेलाची लस दिली आहे, त्यांची फेरतपासणी केली जात आहे. एखाद्या विद्यार्थ्याला त्याचा त्रास होत असल्यास त्याच्यावर खासगी अथवा सरकारी रुग्णालयात तत्काळ उपचार केले जात आहेत. पोटात अन्न नसल्याने अथवा घाबरल्याने आठ-दहा मुला-मुलींना त्रास झाला, परंतु त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. - डॉ. सुमेध अंदूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक 

Web Title: action by government for spreading rumors