धनगर आरक्षणाचा कृती अहवाल पुढील अधिवेशनात: मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

'ज्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र काम केले, त्याच पद्धतीने धनगर समाजाला आरक्षण देण्यापूर्वीही तुमच्याशी चर्चा केली जाईल', असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 'लोकसभा निवडणुकीचे नोटिफिकेशन निघण्यापूर्वी सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यावा', असे विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांनी केले.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विधेयकास विधानसभेने मंजुरी दिल्यानंतर विधान परिषदेत धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला. "मराठा समाजाने एक डिसेंबर रोजी जल्लोष करावा' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. आता धनगर समाजाने जल्लोष कधी करायचा', असा प्रश्‍न सभागृहात उपस्थित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणाचा प्रत्यक्ष कृती अहवाल पुढील अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले.

यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधान परिषदेत उत्तर दिले. मुख्यमंत्री म्हणाले, "धनगर आरक्षणाविषयी 'टीस'चा अहवाल प्राप्त झाला आहे. हा अहवाल केंद्राला पाठविणार आहे. धनगर आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. आदिवासींच्या आरक्षणाला हात न लावता धनगर समाजाला आरक्षण देणार आहोत. सार्वजनिक व्यासपीठांवर बोलणे आणि सभागृहांमध्ये बोलणे, यात फरक असतो. सभागृहामध्ये काही संकेतांचे पालन करावे लागते. त्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाची तारीख जाहीर करता येऊ शकत नाही; पण हे आरक्षण लवकरात लवकर दिले जाईल.'' 

'ज्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र काम केले, त्याच पद्धतीने धनगर समाजाला आरक्षण देण्यापूर्वीही तुमच्याशी चर्चा केली जाईल', असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 'लोकसभा निवडणुकीचे नोटिफिकेशन निघण्यापूर्वी सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यावा', असे विधान परिषदेतील गटनेते शरद रणपिसे यांनी केले.

Web Title: Action report of Dhangar Reservation in the next assembly session Says Devendra Fadnavis