संपकऱ्यांवर कारवाई होणारच

परिवहन मंत्री : कंत्राटी चालक-वाहकांसह एसटी पुन्हा सेवेत येणार
Anil Parab
Anil ParabSakal

मुंबई : संपातील कर्मचाऱ्यांना दिलेली मुदत संपल्यानंतर २२ हजार कंत्राटी चालक आणि वाहकांसह महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) पुन्हा जनतेच्या सेवा करण्याच्या तयारीला लागले आहे. कंत्राटी कामगारांसाठीची निविदा तयार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली. संपात सहभागी झालेल्यांपैकी जे आजपर्यंत कामावर परतलेले नाहीत त्यांना नोकरीची गरज नाही, असे समजून त्यांच्यावर निलंबन, बडतर्फी आणि सेवा समाप्तीची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा परब यांनी पुन्हा दिला.

ते म्हणाले, ‘‘एसटी कर्मचाऱ्यांना जी मुदत दिली होती ती आज संपलेली आहे. यापूर्वी सातवेळा त्यांनी कामावर परत यावे यासाठी आवाहन केले आहे. जे कामावर येणार नाहीत त्यांना नोकरीची गरज नाही, असा आमचा समज झाला आहे. कारण गेले पाच महिने कोणतेही कारण न देता ते गैरहजर आहेत. त्यामुळे ते शिक्षेस पात्र आहेत. त्यांच्यावर थांबलेली कारवाई उद्यापासून सुरू केली जाईल.’’ कोरोनापूर्वीच्या काळात एसटीच्या १२ हजार फेऱ्या ग्रामीण भागात होत होत्या. नवीन रचनेतही अशाच प्रकारे वाहतूक सुरु ठेवण्याचा प्रयत्न आहे. जे उपलब्ध कर्मचारी आहेत, त्यांच्यासह कंत्राटी कर्मचाऱ्यांना घेऊन राज्य मार्ग परिवहन सेवा सुरू केली जाणार आहे, असे परब म्हणाले.

एसटी संपाचे प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असताना कारवाई कशी काय केली जाऊ शकते या प्रश्नावर परब म्हणाले, की ५ तारखेपर्यंत कारवाई करू नका, असे कोणताही आदेश न्यायालयाने दिलेला नाही. अहवालाला कॅबिनेटची मंजुरी मिळाली असून तो अहवाल ५ तारखेला न्यायालयासमोर सादर केला जाईल. कोरोना काळात किती एसटी कर्मचाऱ्यां मृत्यू झाले, कुणाला किती मदत मिळाली याची माहिती मागितली होती. हे प्रतिज्ञापत्र न्यायालयाला सादर केले जाईल.

परब यांची स्पष्टोक्ती

  • जे कर्मचारी हजार झाले आहेत त्यांच्यावर कारवाई नाही.

  • ज्यांची बडतर्फी, निलंबन झाले आहे, मात्र त्यानंतर ते कामावर आले त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली आहे.

  • शुक्रवार (ता.१ एप्रिल)पासून जे कामावर येणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करणार.

  • पुढच्या टप्प्यात बस कंत्राटी पद्धतीने घेऊन प्रति किलोमीटर दराने चालवल्या जातील.

एसटीची स्थिती

  • १२,००० संपापूर्वी धावणाऱ्या बस

  • ५,००० सध्या धावणाऱ्या बस

  • ८,००० नवीन रचनेतील बस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com