गळती रोखण्यासाठी "जलद गतीने शिक्षण' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

सोलापूर - नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्यात जास्त आहे. यामुळे तो शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जातो. यावर मात करण्यासाठी शिक्षण विभागाने नववीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी "जलद गतीने शिक्षण' देण्याचा निर्णय घेतला आहे. 

सोलापूर - नववीत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण राज्यात जास्त आहे. यामुळे तो शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जातो. यावर मात करण्यासाठी शिक्षण विभागाने नववीमध्ये अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी "जलद गतीने शिक्षण' देण्याचा निर्णय घेतला आहे. 

राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा उपक्रम राबविला जात आहे. माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांची गळती रोखण्यासाठी जलद गतीने शिक्षण देण्याचा उपक्रम शिक्षण विभागाने राबविण्याचा निर्णय घेतला. विज्ञान, गणित, इंग्रजी या प्रमुख विषयांमध्ये नववीत विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या मुलांना एप्रिल 2017 किंवा जुलै 2017 मध्ये उत्तीर्ण होण्यासंदर्भात नियोजन करण्यास सांगितले आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत भाषा, गणित, इंग्रजी, विज्ञान या प्रमुख विषयातील शिक्षकांना तज्ज्ञ मार्गदर्शकाकडून प्रशिक्षण द्यावे. "जलद गतीने शिक्षण' देण्यासाठी प्रामुख्याने एप्रिल 2016 मध्ये शाळेत झालेल्या वार्षिक परीक्षेत नववीच्या वर्गात अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी, ऑक्‍टोबर 2016 मध्ये झालेल्या सहामाही परीक्षेत 45 टक्‍क्‍यांपेक्षा कमी गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांची निवड करावी. 

राज्यात एप्रिल 2016 मध्ये झालेल्या नववीच्या परीक्षेत एक लाख 54 हजार 381 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. ते विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यास सांगितले आहे. हे विद्यार्थी त्याच शाळेत पुन्हा नववीच्या वर्गात बसले असतील, त्या विद्यार्थ्यांनी दहावीसाठी 17 नंबरचा परीक्षेचा फॉर्म भरलेला असेल; अन्यथा तो विद्यार्थी माध्यमिक शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर पडला असेल या सगळ्या शक्‍यतांचा अभ्यास करून या एक लाख 54 हजार विद्यार्थ्यांची माहिती शासनाच्या "सरल' प्रणालीवर 31 जानेवारीपर्यंत भरण्याचे आदेशही शाळांना दिले आहेत. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांचा वापर करण्यासही सांगितले. 

त्या शाळांचा होणार सन्मान 
एखाद्या शाळेमध्ये नववी किंवा दहावीच्या वर्गामध्ये प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकही विद्यार्थी या दोन्ही वर्गामध्ये जर अनुत्तीर्ण झाला नसेल, तर अशा शाळांचा विशेष सन्मान सरकारच्या वतीने केला जाणार आहे. 

Web Title: activities for unsuccessful students