कितने अजीब रिश्ते हैं यहाँ के ...

महेश बर्दापूरकर
रविवार, 29 एप्रिल 2018

चित्रपटसृष्टीमध्ये त्वरित प्रसिद्धी, पैसा, यश हवं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. नेमकी हीच गोष्ट जाणून असणारे आणि त्याचा फायदा घेणारेही या व्यवसायात दबा धरून बसलेले आहेत. मुलींना ‘कॉम्प्रमाइज’ करण्याची थेट ऑफर दिली जाते आणि ‘स्ट्रगल’ असह्य झालेले ती स्वीकारून ‘कास्टिंग काऊच’च्या जाळ्यात ओढले जातात...नात्याचं ‘अजीब’ विश्‍व जोपासणाऱ्या चित्रपट व्यवसायाबद्दल...

चित्रपटसृष्टीमध्ये त्वरित प्रसिद्धी, पैसा, यश हवं असणाऱ्यांची संख्या कमी नाही. नेमकी हीच गोष्ट जाणून असणारे आणि त्याचा फायदा घेणारेही या व्यवसायात दबा धरून बसलेले आहेत. मुलींना ‘कॉम्प्रमाइज’ करण्याची थेट ऑफर दिली जाते आणि ‘स्ट्रगल’ असह्य झालेले ती स्वीकारून ‘कास्टिंग काऊच’च्या जाळ्यात ओढले जातात...नात्याचं ‘अजीब’ विश्‍व जोपासणाऱ्या चित्रपट व्यवसायाबद्दल...

हिंदी चित्रपटसृष्टीसाठी प्रत्येक आठवड्याचा शुक्रवार वेगळा ठरतो. या एका दिवसात कोणीतरी एका रात्रीत स्टार बनणार असतं, तर एखाद्या स्टारचं गलबत बुडण्याची शक्‍यता निर्माण होणार असते. प्रदर्शित झालेला चित्रपट चालल्यास पुढच्या अनेक वर्षांची बेगमी पक्की असल्यानं अनेक कलाकार पहिल्या ‘हीट’ चित्रपटाच्या प्रतीक्षेत असतात. त्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते. अर्थात, आपल्यातील गुणवत्तेचा अधिकाधिक वापर करून, अपरिमित कष्ट करून हे यश मिळविण्यासाठी धडपडणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, त्वरित प्रसिद्धी, पैसा, यश हवं असणाऱ्यांची संख्याही कमी नाही. नेमकी हीच गोष्ट जाणून असणारे आणि त्याचा फायदा घेणारेही या चित्रपट व्यवसायात दबा धरून बसलेले असतात. त्यांच्याकडून अभिनेत्रींबरोबर ड्रेस डिझायनरपासून नृत्य दिग्दर्शकापर्यंतची कामे करणाऱ्या सर्वच मुलींचा (आणि मुलांचाही) वापर करून घेतला जातो. ‘कॉम्प्रमाइज’ करण्याची थेट ऑफर दिली जाते आणि ‘स्ट्रगल’ असह्य झालेले ती स्वीकारून बसतात आणि एका जाळ्यात ओढले जातात...

ग्लॅमरचं विश्‍व प्रत्येकच कलाकाराची खूप मोठी परीक्षा घेत असतं. इथं पोचणं, नाव मिळवणं आणि ते टिकवणं सोपं नाही. मोठी स्पर्धा आहे, गटबाजी आहे आणि प्रत्येक ठिकाणी तुमचा गैरफायदा घेणारे ‘शार्क’ दबा धरून बसलेले असतात. त्यांच्या जाळ्यात न अडकता स्वतःच्या हिमतीवर पुढं जाणं हे दिव्यच. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या याच ‘कास्टिंग काऊच’च्या विषयानं उचल खाल्ली आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री श्री रेड्डीनं निर्मात्यानं फसविल्याचा निषेध सार्वजनिक ठिकाणी ‘टॉपलेस’ होऊन नोंदवला. यावर प्रतिक्रिया देताना ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी वादग्रस्त विधान करून त्यात तेल ओतलं. ‘हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये कास्टिंग काऊच’द्वारे शोषण होत असलं, तरी इंडस्ट्री रोजीरोटीही देते,’ हे त्यांचं विधान. या विधानावर प्रतिक्रिया उमटल्या व खासदार रेणुका चौधरी यांच्या विधानामुळं ही ‘लागण’ राजकारणासह सर्वच क्षेत्रांमध्ये झाल्याचं (पुन्हा एकदा) स्पष्ट झालं. हे वादळ उठल्यानंतर अनेकांना आपल्या करियरच्या सुरवातीला घडलेल्या प्रसंगांची ‘आठवण’ झाली.

उषा जाधवसारख्या अभिनेत्रीनं केलेलं वक्तव्य याचं आदर्श उदाहरण म्हणता येईल. ‘धग’ या पहिल्याच चित्रपटासाठी अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली ही अभिनेत्री आपल्यालाही कास्टिंग काऊचच्या प्रसंगामधून जावं लागल्याचं आता मान्य करते. छोट्या गावातून आलेल्या, केवळ अभिनय हीच शिदोरी असलेल्या उषासारख्या अभिनेत्रीचं शोषण होत असणार, यात कोणतंही नवल नाही. राष्ट्रीय पुरस्कार मिळवल्यानंतर, अमिताभ बच्चन यांच्यासमवेत भूमिका साकारल्यानंतर आता उषानं आपल्या सुरवातीच्या दिवसांत घडलेला प्रसंग कथन केला आहे. ज्यांना पुढं येण्याची संधीच मिळाली नाही आणि केवळ शोषण होऊन इंडस्ट्रीच्या बाहेर पडावं लागलं त्यांच्या कथा आणि व्यथा कधीही समोर येणं शक्‍य नाही. त्याचवेळी सुशिक्षित घरातून आलेल्या, आपलं शिक्षण पूर्ण केलेल्या अनेक अभिनेत्रींनी इथं जम बसवला आहे आणि केवळ आपल्याला हव्या त्याच भूमिका स्वीकारत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. उदाहरणादाखल विद्या बालन, राणी मुखर्जी, प्रियांका चोप्रा आदी अभिनेत्रींचा उल्लेख इथं करता येईल. या अभिनेत्रींनी नवोदितांना मार्गदर्शन करून, त्यांना स्वबळावर स्थान मिळवण्यासाठीचे मार्ग सांगून व कोणी अनैतिक मागणी केल्यास एकत्रित आवाज उठवण्यासाठीचं बळ दिल्यास अशा प्रसंगांना अभिनेत्रींना सामोरं जावं लागण्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल. 

#me too
हिंदी चित्रपटसृष्टीच्या कित्येक पट अधिक व्यवसाय करणाऱ्या हॉलिवूडमध्येही कास्टिंग काऊच अस्तित्वात असल्याचं या इंडस्ट्रीतील अभिनेत्रींनी चालविलेल्या #me too या चळवळीतून समोर आलं आहे. अँजेलिना ज्योली व सलमा हा एकसारख्या ज्येष्ठ अभिनेत्रींनी काही निर्माते व दिग्दर्शकांकडून आपलं शोषण झाल्याचं जाहीर करीत खळबळ उडवून दिली. शोषण करणाऱ्यांत मायकेल डग्लस व सिल्व्हेस्टर स्टेलॉनसारख्या विख्यात अभिनेत्यांचीही नावं घेण्यात आली. या चळवळीत अनेक निर्मात्यांना काम थांबवण्याची नामुष्की आली आहे. 

चित्रपटांमध्येही समावेश... 
‘सत्या’ या चित्रपटातील एका प्रसंगात गायिका बनण्याचं स्वप्न पाहणारी विद्या (ऊर्मिला मातोंडकर) एका संगीतकाराकडं जाते आणि तो तिला ब्रेक मिळण्यासाठी ‘तू काय देशील,’ अशी थेट मागणी करतो. या प्रसंगामुळं विद्या पूर्णपणे खचून जाते. अर्थात तिचा अंडरवर्ल्डमधील प्रियकर तिला ‘न्याय’ मिळवून देतो. ‘नाच’ या चित्रपटामध्येही रेवा (अंतरा माळी) ही ड्रेस डिझायनर दिग्दर्शकाकडं काम मागायला जाते, तेव्हा तो तिला ‘तू दिसायला छान आहे, अभिनेत्री का बनत नाहीस,’ अशी ऑफर देतो. त्यासाठी काय ‘कॉम्प्रमाइज’ करावं लागंल याची यादीच तो सांगतो. मधुर भांडारकर यांच्या ‘पेज थ्री,’ ‘फॅशन’, ‘कॉर्पोरेट’ आदी चित्रपटांमधून चित्रपटांबरोबरच फॅशन आणि उद्योगाच्या विश्‍वात घडणाऱ्या एक प्रकारच्या कास्टिंग काऊचचं विश्‍व समोर येतं. चित्रपटसृष्टीमध्ये कलाकारांचे एकमेकांशी असलेल्या नातेसंबंधाचं वेगळेपण ‘कितने अजीब रिश्‍ते हैं यहाँ के,’ या ‘पेज थ्री’मधील गाण्यामधून सहज अधोरेखित होतात.

‘कास्टिंग काऊच’ विषयावर ‘ई सकाळ’वरील प्रतिक्रिया
अशा गोष्टी थांबवायच्या असतील, तर पुरुषांवर असलेले अवलंबित्व संपले पाहिजे. स्त्रियांनीच निर्माते-दिग्दर्शक व्हायला हवे. ‘कास्टिंग काऊच’ घडते, तेव्हा कुणीही बोलत नाही. ब्रेक मिळाला, थोडे नाव झाले की अशी वक्तव्ये केली जातात. अजूनही अशी कामे करणाऱ्या एजंटचे किंवा निर्मात्याचे नाव सांगण्याची हिंमत का होत नाही?
- अमोल

आपल्या व्यवसायात अत्युच्च पद मिळविण्यासाठी, यशाच्या पायऱ्या चढण्यासाठी असा मार्ग स्वखुशीने निवडला जाण्याची शक्‍यताही खूप आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि त्यात आणखी पुढे जाण्यासाठी ‘जुना मार्ग’ सोडून ‘नवीन रस्ता’ शोधला गेला आणि यश मिळविले, तर कुणाची तक्रार असणार आहे?
- अरुण

तडजोड का होईना, ती स्वखुशीने केलेली असते. त्याचा संबंध बलात्काराशी जोडणे हे अक्कल नसल्याचे लक्षण आहे. तडजोडीचा हा प्रश्‍न ऐरणीवर आणू नये, असे नाही; पण या दोन्ही गोष्टींची गल्लत करून आपण बलात्कार या विषयातले गांभीर्य कमी करत आहोत, याचे भान ठेवायला हवे होते.
- गौरी

‘कास्टिंग काऊच’ आणि ‘बलात्कार’ यात फरक असतो, हे खरे असले तरीही ‘काम हवे असेल, तर हे करावे लागेल,’ अशीच अट असते. म्हणजे हादेखील अप्रत्यक्षरीत्या बलात्कारच असतो, नाही का?
- मल्हार कुलकर्णी

वासनांध बनण्याची ही कीड काही घाणेरडी माणसेच कोवळ्या मुलांच्या मनावर बिंबवतात. बलात्कारी होण्यासाठी आवश्‍यक असलेला ‘खाद्य पुरवठा’ त्याला पॉर्न, सिनेमा, मॅगेझिनमधून काही रिकामटेकडे लोक पुरवत असतात.
- राज

कलागुणांवर विश्‍वास ठेवा
मराठी इंडस्ट्री छोटी असल्याने इथे असे प्रकार फारसे घडत नाहीत. मात्र हिंदी चित्रपटसृष्टी मोठी असून, देशभरातून विविध भागांतून कलाकार येतात. तिथे स्पर्धेत टिकण्यासाठी धडपडणाऱ्या कलाकाराला अनेकदा अशा प्रकारांना सामोरे जावे लागते. कास्टिंग काऊचला कसा प्रतिसाद द्यायचा, हे सर्वस्वी कलाकाराच्या हातात असते. चुकीचे मार्ग टाळत आपल्या कलागुणांवर, कर्तृत्त्वावर विश्‍वास असल्यास असे प्रकार घडणारच नाहीत. 
- स्मिता शेवाळे, अभिनेत्री

‘नाही’ म्हणायला शिका
कास्टिंग काऊचचा प्रकार सर्वत्रच घडतो. ज्या ठिकाणी मुली कमकुमत मनाच्या असतात, त्यांना या प्रकाराला सामोरे जावे लागते. विशेष म्हणजे, यात मुलेही बळी पडतात. त्यासाठी नकार द्यायला शिकले पाहिजे. इथे मला ‘अग्निपथ’मधील अमिताभ बच्चन यांचा डायलॉग आठवतो, ‘आगे बढने के लिए ‘ना’ कहना जरूरी है.’ या क्षेत्रात येण्यासाठी प्रत्येकाचे मार्ग वेगवेगळे असतात. काम, प्रसिद्धी यासाठी अनेक जण तडजोडही करतात. त्यामुळे प्रत्येकाला प्रत्येक व्यक्तीबद्दल वेगवेगळा अनुभवही येऊ शकतो.
- अश्‍विनी कुलकर्णी, अभिनेत्री 

सरकारने कायदा करावा
स्वतःमध्ये फारशा अभिनयक्षमता नसताना या क्षेत्रात अल्पावधीत ग्लॅमरमध्ये येण्याची इच्छा असणारे अनेकदा या प्रकाराला बळी पडतात. काम, पैसा, प्रसिद्धी यांसाठी कोणतीही तडजोड करण्याची तयारी ते दाखवतात. नवीन मुलींनी कितीही स्ट्रगल करावा लागला, तरी आपल्या तत्त्वांना तिलांजली देऊ नये, असे मला वाटते. नवीन, धडपडणाऱ्या कलाकारांनाच हा अनुभव येतो असे नाही, तर अनुभवी कलाकारांनाही यातून जावे लागते. त्यासाठी सरकारनेच ‘कास्टिंग काऊच’विरोधात कडक कायदा करावा, जेणेकरून असे प्रकार घडणार नाहीत. 
- सारा श्रवण, अभिनेत्री 

कलेचा व स्वतःचा आदर ठेवा
मी अनेक वर्षे अभिनय क्षेत्रात आहे, मात्र असा अनुभव मला आला नाही. या क्षेत्रात येणाऱ्या नवीन मुलींचे ध्येय मोठे आणि स्पष्ट असल्यास व त्याचबरोबर कामावर निष्ठा असल्यास तुम्ही या प्रकाराला बळी पडणार नाही. कलेचा आणि स्वतःचा आदर ठेवल्यास असे प्रकार नक्कीच घडणार नाहीत. 
- भार्गवी चिरमुले, अभिनेत्री 

स्वतःवर विश्‍वास व संयम हवा
माझ्याबरोबर ‘कॉम्प्रमाइज’ केल्यास तुला चित्रपटात काम देईन, अशी ऑफर कोणी दिल्यास आपण या गोष्टीला नाही म्हणायला पाहिजे. तरुणींनी थोडा संयम ठेवला पाहिजे. टॅलेंट असल्यास सर्व काही शक्‍य होते. कास्टिंग काऊच इंडस्ट्रीत असणे चुकीचे आहे आणि त्याच्यावर काही उपाय नाही.
- कांचन अधिकारी, निर्माती

प्रलोभनांपासून दूर राहा
अभिनय क्षेत्रात येण्यासाठी व्यवस्थित प्रशिक्षण घेऊनच यावे. त्यानंतर चांगल्या लोकांच्या संपर्कात राहावे. तुम्ही चांगल्या रस्त्यावरून गेल्यास असे प्रकार घडणारच नाहीत. अनेकजण दोन-चार लाख रुपये खर्चून, आमिष दाखवून मुलींचा गैरफायदा घेतात. कॉम्प्रमाईज करायला सांगणाऱ्यांचा उद्देशच तो असतो. मुळात त्यांना चित्रपट काढायचा नसतो. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहावे.
- नेहा खान, अभिनेत्री

ठामपणे नकार द्यावा
मी काम, प्रसिद्धी आणि पैसा मिळविण्यासाठी माझ्या तत्त्वांशी तडजोड करत नाही. कास्टिंग काऊचमुळे गुणी व हरहुन्नरी कलाकार पुढे येऊ शकत नाहीत. कास्टिंग काऊचसाठी जबरदस्ती केली जात नसल्याने ठाम राहिल्यास या प्रकारांना आळा बसेल. 
- रूपाली कृष्णराव, अभिनेत्री

अन्यायाविरोधात आवाज उठवा
मला आतापर्यंत कास्टिंग काऊचचा अनुभव आलेला नाही. इंडस्ट्रीत येणाऱ्यांनी आपल्याला काय साध्य करायचे आहे व कोणत्या मार्गाने यश मिळवायचे आहे, हे प्रथम ठरवले पाहिजे. असा प्रकार होत असल्यास त्याविरोधात आवाज उठवलाच पाहिजे.
- अनिता दाते, अभिनेत्री

अस्तित्व कास्टिंग काऊचचे
२००९ - अभिनेत्री सुचेता कृष्णमूर्तीने एका निर्मात्याने माझ्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, असे जाहीर केले. 

२०१४ - दिवंगत ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांनी १९६० च्या दशकात भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये कास्टिंग काऊच अस्तित्वात होते, असे म्हटले.

२०१5 - अभिनेता रणवीर सिंगने आपणही कास्टिंग काऊचची शिकार होण्यापासून थोडक्‍यात बचावल्याचे म्हटले.

२०16 - अभिनेत्री टिस्का चोप्राने आपण एका निर्मात्याच्या विळख्यातून कसे बाहेर आलो, याचा अनुभव कथन केला.

२०१7 - कंगना राणावतसह अनेक अभिनेत्रींनी हिंदी चित्रपटातील कास्टिंग काऊच संस्कृतीबद्दल आवाज उठवला. 

२०१7 - ज्येष्ठ अभिनेत्री डेझी इराणी यांनी लहानपणी भूमिका देताना आपले लैंगिक शोषण झाल्याचे सांगितले.

२०18 - श्री रेड्डी या अभिनेत्रीने चित्रपटसृष्टीमध्ये होत असलेल्या लैंगिक शोषणाविरुद्ध अर्धनग्न होऊन निदर्शने केली. याच घटनेवर प्रतिक्रिया देताना सरोज खानने कास्टिंग काऊच होत असल्याचे विधान केले. 

२०18 - ‘धग’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेत्री उषा जाधवने आपल्याला सुरवातीच्या काळात भूमिकांच्या बदल्यात ‘कॉम्प्रमाइज’ करायला सांगण्यात आल्याचं वक्तव्य केले.

मतचाचणी -
‘कास्टिंग काऊच’ला रोखणे शक्‍य आहे, असे वाटते का?
होय - 29%
नाही - 71%

Web Title: actress casting couch bollywood