अधिक मासामुळे विठ्ठलचरणी गर्दी वाढली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

पंढरपूर - अधिक महिन्यात देवदर्शन, तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याने पुण्य वाढते, अशी लोकभावना असल्याने श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आजपासून गर्दी वाढली आहे. संपूर्ण अधिक महिनाभर शेकडो स्थानिक लोकदेखील पहाटे चंद्रभागेवर स्नान करून नगरप्रदक्षिणा करतात. या व्रताची सुरुवात केलेले भाविक आज पहाटे दिमडी वाजवत हरिनामाचा जयघोष करत प्रदक्षिणा सोहळ्यात सहभागी झाले होते. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी वाढल्याने दर्शनासाठी आज सकाळी चार तास लागत होते.

अधिक मासनिमित्त शहरातील विविध मठांतून भागवत सप्ताहासह धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथेनुसार अनेक मठातून अन्नदानाच्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

चंद्रभागा नदीवरील श्री विष्णुपद मंदिराजवळील बंधाऱ्यात पाणी अडवलेले असल्याने नदी पात्रात पाणी असल्याने भाविकांच्या स्नानाची सोय आहे. आजपासून महिनाभर भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याचे लक्षात घेऊन शहरातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. औरंगाबाद येथील गणेश सावर्डे हे सकाळी सहा वाजता दर्शनाच्या रांगेत उभा राहिले होते. चार तासांनी सकाळी दहाच्या सुमारास त्यांचे दर्शन झाले. दर्शनमंडपासून दर्शनाची रांग चंद्रभागा घाटापर्यंत गेली होती.

Web Title: adhik mas bhavik pandharpur