
Aditya Thackrey: चर्चा तर होणारच! 'आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री…'
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात 'भावी'चे बॅनर मोठ्या प्रमाणावर झळकत आहेत. गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे यांचे बॅनर दिसून आले. त्यानंतर आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे बॅनर लागल्यामुळे पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.
आदित्य ठाकरे आज नागपूरच्या दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात ते प्रदूषित गावांची पाहणी करणार असून स्थानिकांशी संवाद देखील साधणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमध्ये असणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. अशातच आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यापूर्वीच नागपूरमधील पोस्टर्सनी मात्र राजकीय वर्तुळाच लक्ष वेधून घेतलं आहे.
या पोस्टर्सवर आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे.

Banner
नागपूरमधील रामटेक आणि कन्हान येथील रस्त्यांवर आणि बस स्टॉपवर हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. त्यावर भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे साहेब, आपले रामटेक विधानसभा मतदारसंघात हार्दिक स्वागत, असा मजकूर या बॅनरवर लिहण्यात आला आहे.
ठाकरे गटाचे युवा सेना जिल्हाप्रमुख लोकेश बावनकर आणि उपजिल्हाप्रमुख समीर मेश्राम यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरवर बावनकर आणि मेश्राम यांचेही फोटो आहेत. तसेच शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचेही या बॅनरवर फोटो आहेत. हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. तसेच हे बॅनर सोशल मिडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.
नागपुरात काही दिवसांपुर्वी देवेंद्र फडणवीस यांचेही बॅनर लागले होते. भावी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचा या बॅनरवर उल्लेख होता. त्यानंतर अजित पवार यांचे ही नागपुमध्ये बॅनर झळकले होते. त्यावरही भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होता. तर राज्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही बॅनर लावण्यात आले होते. त्यावरही भावी मुख्यमंत्री असाच उल्लेख होता.