
अजित पवार मुख्यमंत्री म्हणून चालतील का? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं | Ajit Pawar
माथेरान - युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी माथेरानचा दौरा केला. यावेळी त्यांनी विविध विषयावर माध्यमाशी चर्चा केली. महाविकास आघाडी ही आपल्या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आली आहे. जिथे जिथे हुकूमशाहीची लक्षणे दिसत आहेत तिथे आम्ही लढत आहोत आणि ही लढाई पुढेही अशीच सुरू राहील असं ते यावेळी म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांना कोकणात येऊन दाखवा असं जे आव्हान देण्यात आलं होतं त्या आव्हानाला आम्ही महत्त्व देत नाही. सभेला परवानगी नाकारणे ही तर हुकूमशाही आहे. हे सरकार तेथील नागरिकांवर दादागिरी करतात.
मुळात प्रश्न हाच राहतो की, इतका चांगला प्रकल्प असेल तर लाठीचार्ज आणि अश्रूधुर सोडण्याची काय गरज आहे? अनेक ठिकाणी ही हुकूमशाही आपल्याला दिसते. ही हुकूमशाहीची राजवट आहे असंही ते म्हणाले.
अजित पवार मुख्यमंत्री म्हणून चालतील का?
मुख्यमंत्री कोण होणार यावर सध्या चर्चा नाहीत. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की, आपलं राज्य अंधारात गेलं आहे. खूप सारे उद्योजक आपल्या राज्यात येत नाहीत, गुंतवणूक होत नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये गुंतवणूक होत होती. महाविकास आघाडीच्या काळात शाश्वत विकास होत होता तसा आता होत नाही.
पहिली गोष्ट म्हणजे संविधान रक्षण हा आमचा महत्त्वाचा हेतू आहे आणि आम्ही खुर्चीसाठी एकत्र आलेलो नाही. जसे गद्दार खुर्चीसाठी एकत्र येतात तसे आम्ही येत नाही. अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.