विधानसभा निवडणूक लढविण्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

जनआशीर्वाद यात्रेनिमित्त ठाकरे दोन दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. वरळीमधून आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा ठराव तेथील नागरिकांना केला.

औरंगाबाद : ''वरळी, मालेगाव, दिग्रस येथील कार्यकर्त्यांनी त्यांच्या मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला आहे. तथापि, जनतेची मते जाणून घेऊन त्यांच्या आदेशानंतरच कुठून निवडणूक लढायची, याचा निर्णय घेणार आहे,'' असे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी (ता.31) पत्रकार परिषदेत सांगितले. 

जनआशीर्वाद यात्रेनिमित्त ठाकरे दोन दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत. वरळीमधून आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवावी, असा ठराव तेथील नागरिकांना केला. याबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले, की जनतेने आदेश दिला तर निवडणूक लढवू. वरळीप्रमाणेच मालेगाव, दिग्रसहूनही मागणी होत आहे. त्यामुळे या तिन्हींपैकी कुठून निवडणूक लढवायची, याचा निर्णय लवकरच घेणार आहोत.

मुख्यमंत्री तुमचे कौतुक करतात. तुम्हाला भविष्यात मुख्यमंत्री व्हायला आवडेल की एखाद्या मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळात काम करायला आवडेल असे ठाकरे यांना विचारले असता, ते म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांनी माझे कौतुक केले, मी त्यांचा आभारी आहे. शिवसेना, भाजप आम्ही सोबत आहोत आणि सोबत काम करीत राहू.'' राणे यांच्या भाजपमधील संभाव्य प्रवेशाबद्दल विचारले असता, ''एका विशिष्ट व्यक्तीबद्दल मी बोलणार नाही,'' असे त्यांनी स्पष्ट केले. 

आदित्य ठाकरे म्हणाले... 
- यात्रेदरम्यान नागरिकांचे विविध प्रश्न लक्षात आले 
- सरकारची कर्जमुक्ती गावांपर्यंत पोचली नाही 
- सरकारसह सर्वच राजकीय पक्षांनी संकटात सापडलेल्यांना मदत करावी, एकमेकांवर आरोप करण्यात वेळ घालवू नये 
- शिवसेना गुणवत्तेच्या आधारावर 'इनकमिंग' करीत आहे 

समाधानी राहिलो तर प्रगती खुंटते 
औरंगाबाद महापालिकेच्या कारभारावर तुम्ही खूश किंवा समाधानी आहात का, या प्रश्‍नावर आदित्य ठाकरे म्हणाले, की मी कधी समाधानी किंवा खूश नसतो, आपण समाधानी राहिलो तर प्रगती खुंटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray said about contesting assembly elections