आदित्य ठाकरेंच्या 'त्या' विधानाने भाजपमध्ये अस्वस्थता

मृणालिनी नानिवडेकर  
रविवार, 21 जुलै 2019

"विधानसभा निवडणुकीसाठी युती करताना शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे आमच्यात ठरले आहे' असे वक्तव्य युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

मुंबई - "विधानसभा निवडणुकीसाठी युती करताना शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे आमच्यात ठरले आहे' असे वक्तव्य युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आपल्यापेक्षा निम्मे बळ असणाऱ्या शिवसेनेला अर्धा वाटा देणे आवश्‍यक आहे का, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना पडला आहे.

जनआशीर्वाद यात्रेत खासदार संजय राऊत यांचीच भाषा आदित्य यांनीही सुरू केल्याने भाजपनेत्यांनी प्रथमच मुंबई दौऱ्यावर आलेले कार्यकारी अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांच्याशी चर्चा केली. "बुथ मजबूत करा, तुम्हीच त्या-त्या वॉर्डातील नेते आहात', असे सांगत नड्डा यांनी युतीची चिंता करू नका, असा सल्लाही कार्यकर्त्यांना दिला. 

भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात समसमान वाटपाची चर्चा झाली. मुख्यमंत्रिपदाची कारकीर्दही वाटून घेतली जाणार, हे मी स्वत: ऐकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या वेळी हजर होते, असे आदित्य यांनी पत्रकारांना सांगितले. संजय राऊत यांनीही हेच विधान केले होते. याची दखल भाजप-सेनेतील काही मध्यस्थांनी घेतल्याचेही समजते. लोकसभेच्या निकालांनंतर आत्मविश्‍वास बळावलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी हा आग्रह अयोग्य नाही का, असा प्रश्‍न नेतृत्वासमोर उभा केला आहे. नड्डा यांनी याकडे दुर्लक्ष करत "युतीचे आमच्यावर सोडा' असे कार्यकर्त्यांना सांगितले. 

मुंबईत शिवप्रतिमेला वंदन करून नड्डा यांनी प्रथम जिल्हाध्यक्षांना आणि नंतर आमदार, खासदारांना संबोधित केले. अमित शहांनी दिलेला बुथसबलीकरणाचा मंत्र या बैठकीत पुन्हा नड्डा यांनी आळवला. रात्री उशिरापर्यंत भाजपच्या निवडणूक निर्णय समितीची बैठक सुरू होती. युतीचा निर्णय बदलणार नाही, असे या वेळी सूचित करण्यात आले असले, तरी मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतेही आश्‍वासन दिलेले नाही. "मुख्यमंत्री भाजपचाच असेल' असे वक्तव्य महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी केले होते. 

मुख्यमंत्र्यांची "विकासयात्रा' 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 1 ऑगस्टपासून अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरीच्या संत तुकडोजी महाराजांच्या आश्रमापासून विकासयात्रा सुरू करणार असल्याचे समजते. 21 ऑगस्टपर्यंत ही यात्रा महाराष्ट्राच्या विविध भागांचा प्रवास करेल आणि नाशिकच्या काळाराम मंदिरात तिचा समारोप होईल. यादरम्यान फडणवीस दररोज तीन-चार सभा घेतील. पाच वर्षांत महाराष्ट्रासाठी केलेले प्रयत्न हा निवडणुकीतील प्रचाराचा मुख्य मुद्दा राहणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aditya Thackeray That statement the BJP party discomfort