प्रशासकीय कामकाज खोळंबणार! सरकारी कर्मचारी मंगळवारपासून ‘जुन्या पेन्शन’साठी बेमुदत संपावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Strike
प्रशासकीय कामकाज खोळंबणार! सरकारी कर्मचारी मंगळवारपासून ‘जुन्या पेन्शन’साठी बेमुदत संपावर

प्रशासकीय कामकाज खोळंबणार! सरकारी कर्मचारी मंगळवारपासून ‘जुन्या पेन्शन’साठी बेमुदत संपावर

सोलापूर : राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांसह सर्वच विभागातील सरकारी, निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसह इतर प्रलंबित मागण्यासाठी आता मंगळवारपासून (ता. १४) बेमुदत संपावर जाणार आहेत. त्यामुळे महसूलसह बहुतेक विभागातील प्रशासकीय कामाचा बोजवारा उडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मागील आठवड्यातील काही दिवस महसूल परिषदेसाठी तर त्यानंतर क्रीडा स्पर्धासाठी महसूल कार्यालये रिकामी होती. सर्व महत्त्वाचे अधिकारी व कर्मचारी आठवडाभर गायब असतानाच आता सलग सुट्या आणि पुन्हा संप, याचा परिणाम जिल्ह्यातील प्रशासकीय कामावर होणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागणीसाठी सध्या २००५ नंतर शासकीय सेवेत दाखल झालेले सरकारी कर्मचारी संपावर जात आहेत.

या संपाला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, शासकीय निमशासकीय संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटना, सोलापूर महापालिका कर्मचारी संघटना, कामगार युनियन (सोलापूर महापालिका), काँग्रेस कमिटी कामगार सेल, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी संघटना, सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटना, यासह अनेक कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

सरकारकडून आज निर्णयाची अपेक्षा

राज्यातील बहुतेक सर्वच शासकीय विभागातील कर्मचारी जुन्या पेन्शन योजना लागू करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. विरोधी पक्षांनी देखील सरकारकडे तशी मागणी केली आहे. त्यामुळे उद्या (सोमवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मंगळवारपासून शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरु होणार असून तत्पूर्वी, सरकारकडून सकारात्मक निर्णयाची घोषणा होवू शकते.

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा पाठिंबा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जुनी पेन्शन योजनेसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला पाठिंबा दिला आहे. महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटना या संपाचे नेतृत्व करीत आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ हा मध्यवर्ती संघटनेशी संलग्न नाही. तरीपण, २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी, यासाठी मध्यवर्ती संघटनेला आमचा पाठिंबा राहील, असे संघटनेचे नेते संभाजीराव थोरात यांनी स्पष्ट केल्याचे कार्यकारी अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे यांनी सांगितले.