महापरीक्षा पोर्टल रद्द केल्यानंतर भरतीसाठी 'हा' असेल एकमेव पर्याय!

Maha-Pariksha
Maha-Pariksha

पुणे : सरकारी सेवेतील वर्ग तीन आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या भरतीत पारदर्शकता आणण्यासाठी मागील सरकारने महापरीक्षा पोर्टल सुरू केले. परंतु तांत्रिक चुकांसह या पोर्टलच्या हेतूबाबत परीक्षार्थींनी शंका उपस्थित केल्या असून, ते तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.

राजकीय नेत्यांनी देखील त्याची मागणी आहे. हे पोर्टल बंद झाल्यानंतर दुसरी व्यवस्था काय, या प्रश्‍नाला उत्तरही त्यांनी दिले आहे. सर्वच भरती परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घ्याव्यात, हा पर्याय त्यांनी सूचविल्या आहेत. 

तांत्रिक अडचणी, गैरव्यवहाराचे आरोप करीत या पोर्टलच्या विरोधात फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियावर 'बॅन महापरीक्षा पोर्टल'वर चळवळ सुरू करण्यात आली आहे. अनेकजण त्याला प्रतिसाद देत असून, त्याविरोधात रान उठविण्यात आले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे परीक्षार्थींनी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर त्यांनी नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हे पोर्टल रद्द करण्याची मागणी केली आहे. आता नवे सरकार याबाबत कोणता निर्णय घेणार याकडे परीक्षार्थींचे लक्ष लागले आहे. 

'एमपीएससी स्टुडंट्‌स राईट'चे महेश बडे यांनी सांगितले, की गेल्या तीन वर्षांपासून आम्ही हे पोर्टल रद्द करण्याची मागणी करीत आहोत, परंतु त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. त्यावर परीक्षार्थ्यांना विश्‍वास नसेल, तर सरकारने तातडीने ते रद्द केले पाहिजे. सर्वांचा विश्‍वास असलेली एमपीएससी सारखी यंत्रणा आहे. त्याद्वारे सर्व सरकारी पदांची भरती करावी. यातून गुणवत्ता असलेल्या ग्रामीण भागातील तरुणांना न्याय मिळेल आणि गैरप्रकारांनाही आळा बसेल. 

काही दिवसांत पोर्टल रद्द 

महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पोर्टल रद्द करावे, अशी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, ''पोर्टलबद्दल आम्ही सर्वात आधी भूमिका घेऊन ते रद्द करण्याबाबत युवकांच्या जाहिरातनाम्यान आश्‍वासन दिले होते. आता आमचे सरकार आले आहे, वरिष्ठ स्तरावर याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. काही दिवसांत सरकार स्थिर स्थावर झाले की पोर्टल रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. यापुढे एमपीएससीमार्फत भरती करावी. ही आस्थापनेतही सगळे आलबेल आहे वा ती तेवढी सक्षम आहे, असे नाही. त्याकडेही लक्ष द्यावे लागेल.'' 

महापरीक्षा पोर्टल रद्द झाले, तर भरतीसाठी एमपीएससी हा एक पर्याय आहे. पण त्यांच्याकडे जागा आणि मनुष्यबळाची कमतरता हा प्रश्‍न उद्‌भवू शकतो. त्याबरोबरच महाटेट आणि भरती परीक्षा घेणारी आणि एक स्वायत्त संस्था म्हणजे राज्य परीक्षा परिषद. ती पुण्यात आहे, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. या संस्थेकडेही पूर्णवेळ सरकारी कर्मचाऱ्यांचा अभाव मात्र आहेच. 
 
महापोर्टलवरील आरोप 
- उत्तरपत्रिकेची पडताळणी संधी नाही, चुकीच्या प्रश्‍नांसाठी गुण देण्याची पद्धत. 
- प्रमाणित आणि दर्जेदार परीक्षा केंद्र नसणे, ठराविक संस्थांनाच परीक्षा केंद्रे 
- परीक्षा केंद्रावर गैरप्रकार, ठराविक विद्यार्थ्यांना विशिष्ट जागा देणे. 
- परीक्षांचे निकाल चुकीचे लावणे, अभ्यासू विद्यार्थ्यांना कमी गुण मिळणे. 
- ऑनलाइन परीक्षेदरम्यान प्रमाणित पर्यवेक्षक नसणे, तिथे खासगी व्यक्तीची नेमणूक. 
- महापरीक्षा पोर्टलच्या कार्यालयाचा पत्ता नसणे आणि कार्यपद्धती पारदर्शक नसणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com