Maharashtra Politics: महाराष्ट्रातसुद्धा वेलकम! शिरसाठांनी राष्ट्रवादीला दिली खुली ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

Maharashtra Politics: महाराष्ट्रातसुद्धा वेलकम! शिरसाठांनी राष्ट्रवादीला दिली खुली ऑफर

भाजपला नुकत्याच पार पडलेल्या तीन राज्यांच्या निवडणुकीत चागंलंच यश मिळालं आहे. त्यापैकी, नागालँडच्या निकालात एनडीपीपी आणि भाजप यांच्या युतीला स्पष्ट बहुमत मिळाल आहे. या निवडणुकीत महाराष्ट्रातील इतर २ पक्षांनीही जागा मिळवल्या आहेत. यामध्ये रामदास आठवलेंच्या आरपीआयने 2 तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 7 जागांवर विजय मिळवला आहे.

नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप सरकारला इतर छोट्या पक्षांनीही पाठिंबा दिला. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेत जाण्याचा आग्रह धरल्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीच्या या पाठिंब्यावरुनच मनसेने राष्ट्रवादीच्या भूमिकेवर खोचक टीका केली आहे.

नागालँडचे राष्ट्रवादीचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. या भेटीत स्थानिक नेत्यांच्या मागणीवर चर्चा करण्यात झाली. त्यानंतर बैठकीत नागालँड सरकारला पाठिंबा देणार यावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर शरद पवार यांच्या भूमिकेवरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी देखील यासंबधी एक व्हिडिओ ट्वीट केला आहे तर शिंदे गटकडून शरद पवार यांना आमच्यासोबत आलात तर तुमचं स्वागत आहे अशी ऑफरच दिली आहे.

शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी युतीबाबत विधान केलं आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादी भाजप सोबत जाऊ शकते, त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रवादी आमच्यासोबत आल्यास त्यांचं स्वागत असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रवादी महाराष्ट्रात शिंदे गटाला पाठिंबा देणार का यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणालेत संजय शिरसाट?

राष्ट्रवादी नागालँडमध्ये भाजपसोबत जाऊ शकते मग महाराष्ट्रात ते आमच्यासोबत आल्यास त्यांचं स्वागतच आहे. शरद पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा लागली असल्याचं सांगतानाच ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होऊ शकत नाही असं म्हणत घोषणा दिल्यामुळे कोणी मुख्यमंत्री होत नाही असं संजय शिरसाट यांनी म्हंटलं आहे.

नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिलाय. सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत झालं असताना देखील नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या पाठिंब्याची सध्या चर्चा सुरू आहे.