
Ajit Pawar : NCPच्या उमेदवाराची मिरवणूक सुरू; पण, अजित पवार कुठे आहेत?
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर आज राष्ट्रवादीने अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीकडून पक्षाने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
ही जागा बिनविरोध होईल अशी स्थिती असताना राष्ट्रवादीने अखेरच्या क्षणी नाना काटे यांना उमेदवारी देऊन ही निवडणुक बिनविरोध केली नाही. ही उमेदवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी जाहीर केली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.
नाना काटे यांचा अर्ज भरण्यासाठी कार्यकर्ते, मित्रपरिवार सर्वजण एकत्रित आले आहेत. अर्धे कार्यकर्ते डांगे चौकात जमले आहेत. तर अर्धे कार्यकर्ते नाना काटे यांच्या घरी जमले आहेत. मात्र अजित पवार अजूनही आपल्या पुण्यातील घरी आहेत त्यामुळे राष्ट्रवादीत चाललंय तरी काय असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जातोय. याबाबतची माहिती 'साम' या वृत्तवाहिनीने दिली आहे.
राष्ट्रवादीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रॅली काढण्यात येत आहे. शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. ही रॅली निघाली आहे. त्यामुळे अजित पवार आणखी उपस्थित न राहिल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. त्याचबरोबर राहुल कलाटे यांना उमेदवारी देणार असल्याची माहिती समोर आली होती पण अचानकपणे नाना काटे यांची उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे पुन्हा एकदा पक्षात काय सुरू आहे अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
तर नाना काटे यांना उमेदवारी दिल्यानंतर राहुल कलाटे यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर शिवसेनेतून राहुल कलाटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना उमेदवारी देऊ असं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं होतं. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अचानकपणे नाना काटे यांना उमेदवारी दिली आहे.
ही रॅली 10.30 वाजता सुरू होणार असल्याची माहिती समोर आली होती. दोन्ही रॅली सुरू झाल्यानंतर अजित पवार 11.30 वाजण्याच्या सुमारास चिंचवडच्या दिशेने रवाना झाले आहेत. नाना काटे यांची उमेदवारी अर्ज भरताना अजित पवार उपस्थित असणार आहेत.