गावांनंतर शहरे पाणीदार करणार : आमीर खान 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी, पाणीदार करण्यासाठी गावागावांतील लोक एकत्र येत आहेत. आपल्या प्रत्येकाची ही एकजूट, हा लोकसहभागच एकमेकांची ऊर्जा वाढवतोय, असा विश्वास अभिनेता आमीर खान याने व्यक्त केला.

लातूर : गावे दुष्काळमुक्त करण्यासाठी, पाणीदार करण्यासाठी गावागावांतील लोक एकत्र येत आहेत. आपल्या प्रत्येकाची ही एकजूट, हा लोकसहभागच एकमेकांची ऊर्जा वाढवतोय, असा विश्वास अभिनेता आमीर खान याने व्यक्त केला. गावांनंतर शहरातील लोकांना एकत्र आणून शहरे पाणीदार करणार आहे, त्यावर सध्या काम सुरू आहे, असेही तो म्हणाला. 

पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेअंतर्गत महाश्रमदान हा उपक्रम झाला. यानिमित्ताने तो आणि अभिनेत्री आलिया भट यांनी फत्तेपूर (ता. औसा) येथे ग्रामस्थांसोबत श्रमदान केले. या वेळी दोघांनीही पत्रकारांशी संवाद साधला. आमीर म्हणाला, ""मला प्रसिद्धी मिळावी, माझे चित्रपट चालावेत म्हणून मी हे काम हाती घेतलेले नाही. हा इव्हेंटही नाही. दुष्काळ नाहीसा व्हावा आणि गावे पाणीदार व्हावीत हाच एकमेव हेतू आहे. या कामासाठी आम्ही गावे आधी निवडली. आम्हाला शहरांमध्ये जे पाणी मिळते तेही कुठल्यातरी गावातीलच असते. गावे पाण्याने समृद्ध झाली की; मग शहरांमध्येही असेच पण वेगळे उपक्रम हाती घेणार आहोत.'' 

"मी इथं येऊन श्रमदान करतेय आणि तुमच्यावर उपकार करतेय, असे अजिबात नाही. खरे तर उलटे आहे. तुम्ही आहात म्हणून आम्ही शहरातील लोक आहोत. अगर आप ना होते, तो हम ना होते', असे म्हणत आलियाने ग्रामस्थांशी संवाद साधला. इथे आल्यानंतर सुरवातीला श्रमदान कसे करायचे, हे माहिती नव्हते. त्यामुळे या खडकाळ भागात मी एकीकडे पडत होते तर टोपले दुसरीकडे. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी जसे रिटेक द्यावे लागतात तसे रिटेक इथे करीत होते. त्यातूनच शिकत गेले, असे ती म्हणाली. 

Web Title: After the villages the cities will be drenched says Amir Khan