वर्षभरानंतर मिळतेय अत्यल्प विमा रक्‍कम

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 डिसेंबर 2018

- अर्जदार 12.77 लाख 
- पात्र फक्‍त 2.56 लाख शेतकरी 
सोलापुरातील फक्‍त 213 शेतकरी पात्र 

सोलापूर : राज्यातील सततचा दुष्काळ अन्‌ नैसर्गिक आपत्ती, तर दुसरीकडे पिकांचे गडगडलेले दर, अशा परिस्थितीत असलेल्या बळिराजाला पीकविम्याचा आधार वाटतो. परंतु 2017-18 मध्ये रब्बी हंगामात पीकविमा भरलेल्या 12 लाख 77 हजार शेतकऱ्यांपैकी फक्‍त दोन लाख 56 हजार शेतकरीच शासनाच्या निकषांनुसार भरपाईसाठी पात्र ठरल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

सद्यस्थितीत दुष्काळामुळे राज्यात फक्‍त 22 टक्‍के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे. जमिनीत ओलावा नसल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरणीच केली नाही. पेरणी न केलेल्या अथवा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांकडून रब्बीचा पीकविमा भरला जातोय. परंतु, ज्या महसूल मंडळात 25 टक्‍क्‍यांपेक्षा कमी पेरणी झाली आहे, अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्यास विमा भरलेल्यांना सरसकट भरपाई मिळणार आहे. दुसरीकडे पेरणी क्षेत्रावरील पिकांचे कापणी प्रयोग झाल्यानंतर दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांना 100 टक्‍के भरपाई मिळणार आहे. परंतु, पीकविमा मिळाल्यानंतर दुष्काळ निधी मिळणार की नाही, असा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये असल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी विमा भरण्याकडे पाठ फिरविली आहे. विमा कंपन्या मात्र त्यासाठी शेतकऱ्यांकडे आग्रह करत असल्याची चर्चा आहे. 

सोलापुरातील फक्‍त 213 शेतकरी पात्र 
पेरणी करूनही पीक हाती न लागल्याने 2017-18 मध्ये रब्बी हंगामात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा भरला. परंतु, विमा कंपनीसह शासनाच्या निकषांनुसार त्यातील फक्‍त 213 शेतकरीच भरपाईसाठी पात्र ठरले आहेत. विमा कंपनीकडून 13 महिन्यांनतर आता त्या शेतकऱ्यांना फक्‍त आठ लाख 76 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. या याद्या दोन दिवसांत पोर्टलवर टाकल्या जातील, असे कृषी विभागाचे सांख्यिकी अधिकारी उदय देशमुख यांनी सांगितले. 

राज्याची स्थिती 
रब्बी पीकविमा ः 2017-18 
अर्जदार शेतकरी ः 12.77 लाख 
भरलेली विमा रक्‍कम ः 31.38 कोटी 
भरपाईसाठी पात्र शेतकरी ः 2.56 लाख 
मिळणारी भरपाई ः 80.59 कोटी 

Web Title: After Year getting a very low insurence amount