आघाडीला तटकरेंचाही दुजोरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

पंढरपूर - राज्यात होणाऱ्या आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी होणार असल्याचे स्पष्ट संकेत देत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विक्रम काळे यांची उमेदवारी जाहीर केली. कोकण शिक्षक मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पाठिंबा दिला आहे. अकलूज येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जन्मशताब्दी कार्यक्रमासाठी निघाले असता, आज दुपारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तटकरेंनी विधान परिषद आणि महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीविषयी राष्ट्रवादी कॉंग्रेसची भूमिका मांडली.

ते म्हणाले, 'राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. आजपर्यंत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मतभिन्नता होती. परंतु आता दोन्ही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनभिन्नता असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे नेते भाजपच्या विरोधात बोलतात; परंतु त्यांच्याच पक्षाचे राज्यातील आणि केंद्रातील मंत्री मात्र सरकारच्या विरोधात बोलताना दिसत नाहीत. शिवसेना ही कायम दुटप्पी भूमिका घेत आली आहे.''

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसचे नेते संजय निरुपम यांनीच स्वतंत्र लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे. उमेदवारांची अंतिम यादी लवकरच जाहीर केली जाणार आहे. मात्र ठाणे महानगरपालिकेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी करण्यासंबंधीची चर्चा सुरू आहे. या बाबत आमदार नारायण राणे यांच्याशी चर्चा झाली आहे. दोन्ही पक्षांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनीही आघाडीसाठी आग्रह धरला आहे. त्यानुसार ठाण्यामध्ये आघाडी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य
जलसंपदा विभागातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी माझी आणि अजित पवार यांची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान आम्ही तपासयंत्रणेला यापूर्वीही सहकार्य केले आहे. यापुढेही आम्ही सहकार्य करणार आहोत. या तपासातून राज्यातील जनतेसमोर लवकरच सत्य काय ते बाहेर यावे अशीच आमची भूमिका आहे. खासदार किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचेही तटकरे यांनी या वेळी सांगितले.

Web Title: aghadi oppose by sunil tatkare