पालकमंत्र्यांच्या पंढरीतील बैठकीकडे आंदोलकांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

पंढरपूर - आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांना श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करू न देण्याचा इशारा विविध संघटनांनी दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आज दुपारी संबंधितांची बैठक बोलवली; परंतु आंदोलकांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. पालकमंत्री शासकीय विश्रामगृहात बसून होते; परंतु आंदोलक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने चर्चा होऊ शकली नाही.

अनेक वेळा शांततेच्या मार्गाने मोर्चे काढून आणि निवेदने देऊनदेखील शासनाने मागण्यांची दखल न घेतल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांना आषाढीची महापूजा करू न देण्याचा इशारा दिला आहे. बुधवारी धनगर आरक्षण कृती समितीनेही त्यांच्या विविध मागण्यांची दखल घेण्यात येत नसल्याने शासनाचे श्राद्ध घालण्याचे ठरवून मराठा व कोळी समाजबांधवांच्या साथीने मुख्यमंत्र्यांना पूजा करू देणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे.

या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री विजयकुमार देशमुख अधिवेशन सोडून आज पंढरपूरला आले. त्यांनी आमदार भारत भालके यांच्या उपस्थितीत येथील शासकीय विश्रामगृहात आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. संबंधितांना बैठकीचे निरोप पोचवण्यात आले; परंतु आंदोलकांनी आता चर्चा करायची नाही, अशी भूमिका घेऊन पालकमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे पालकमंत्री देशमुख यांना वाट पाहत बसून राहावे लागले.

आमदार भारत भालके यांनी आंदोलकांच्या भावना तीव्र आहेत. काही वर्षांपूर्वी आषाढी यात्रेच्या वेळी गोपाळपूर येथे चेंगराचेंगरी झाली होती. त्यामध्ये दहा वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता. सद्यःस्थितीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने आषाढीच्या महापूजेसाठी येण्याविषयीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी विचारपूर्वक घ्यावा, अशी भूमिका मांडली.

Web Title: agitation vijaykumar deshmukh meeting pandharpur