MPSC Exam
MPSC Exam

"एमपीएससी'ची 11 ऑक्‍टोबरलाच परीक्षा ! आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने परीक्षा रद्दसाठी मंगळवारी "मातोश्री'समोर आंदोलन 

सोलापूर : राज्यातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत असून सद्य:स्थितीत राज्यभरात कोरोना बाधितांची संख्या 14 लाखांपर्यंत झाली आहे. दुसरीकडे मृतांची संख्या 37 हजारांवर पोचली आहे. तरीही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षा वेळापत्रकानुसारच होईल, असे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रेही वितरित करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने राज्यसेवेची पूर्वपरीक्षा दोनवेळा पुढे ढकलली होती. तर विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुणे विभाग वगळता अन्य विभागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी दिली होती. त्याला विरोध करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या नजीकचे परीक्षा केंद्र निवडण्याची संधी मागितली. मात्र, आयोगाने ती मागणी पूर्ण केली नाही. त्यानुसार अडीच लाख विद्यार्थ्यांपैकी अवघ्या नऊ हजार जणांनीच परीक्षा केंद्र बदलले. आता राज्यातील पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर, नाशिक, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, नागपूर या जिल्ह्यांमधील कोरोनाचा संसर्ग तथा प्रादुर्भाव वाढला आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राज्यभर त्याचे तीव्र पडसाद उमटत असून आरक्षणाचा निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्‍यात सापडले आहे. यापूर्वी निवड झालेल्यांनाही नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे आयोगाने परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मात्र, यापूर्वी तीनवेळा परीक्षा पुढे ढकलली असून आता पुन्हा वेळापत्रकात बदल करणे शक्‍य नसल्याचेही आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

परीक्षा वेळापत्रकानुसारच होईल 
आयोगाने यापूर्वीच "एमपीएससी'च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसह कम्बाईन आणि अभियांत्रिकी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 11 ऑक्‍टोबर रोजी राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार असून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रेही वितरित करण्यात आली आहेत. त्यामुळे परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच घेण्याचे नियोजन आहे. 
- हणमंत आवताडे, सहसचिव, एमपीएससी, मुंबई 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com