कृषी क्षेत्रात "स्टार्ट अप'साठी तरुणांना बळ देणार - मोदी 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

पुणे - ""भविष्यातील शेतीमध्ये तंत्रज्ञान मोठी भूमिका पार पाडणार आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातही "स्टार्ट अप' सुरू करण्यासाठी तरुणांना बळ देण्याची वेळ आली आहे. तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात परिवर्तन होईल,'' असा विश्‍वास पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे व्यक्त केला. 

पुणे - ""भविष्यातील शेतीमध्ये तंत्रज्ञान मोठी भूमिका पार पाडणार आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातही "स्टार्ट अप' सुरू करण्यासाठी तरुणांना बळ देण्याची वेळ आली आहे. तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात परिवर्तन होईल,'' असा विश्‍वास पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी येथे व्यक्त केला. 

मांजरी येथील "वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट'तर्फे (व्हीएसआय) आयोजित "शुगरकेन व्हॅल्यू चेन-व्हिजन 2025 शुगर' या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेचे मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष दिलीपराव वळसे-पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष शिवाजीराव गिरधर पाटील आदी उपस्थित होते. 

मोदी म्हणाले, ""दुसरी हरित क्रांती करण्यासाठी तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय शास्त्रात मोठा बदल झाला आहे. आता तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात परिवर्तन होणार आहे. त्याला जनुकीय संकरण, अद्ययावत तंत्रज्ञान, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेची जोड दिली पाहिजे. मृदा तपासणी ही मानवी आरोग्य तपासणी इतकीच महत्त्वाची आहे. शेतकऱ्यांनी प्रत्येक पीक घेण्यापूर्वी ही तपासणी केली पाहिजे. जागतिक पातळीवर कृषी क्षेत्रात संशोधन आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जातो. आपल्या देशात नवे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी "व्हीएसआय'ने पुढे यावे.'' 

""गुजरात आणि महाराष्ट्रातील शेतकरी आता उसाच्या पिकात आंतरपीक घेत आहे. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांचे होणारे नुकसान या आंतरपिकातून कमी होत आहे. जगात आणि आपल्या देशात होणाऱ्या उसाच्या प्रती एकर उत्पादनात मोठी तफावत आहे. साखर उताऱ्यातही खूप फरक आहे. त्याही दक्षिण, मध्य आणि उत्तर भारतात वेगवेगळे अनुभव येतो. अशा वेळी या क्षेत्रातील शास्त्रज्ञांना बरोबर घेऊन, उद्योगांच्या मदतीने शेतकऱ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत प्रगत ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यात येत आहे. त्याचे दृश्‍य परिणाम दिसत आहेत. व्हीएसआयने बांबूच्या संशोधनाकडे लक्ष द्यावे अशी सूचना त्यांनी केली. ते म्हणाले, ''ऊस आणि बांबू यांच्यात साम्य आहे. बांबूला जागतिक स्तरावर चांगली मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो,'' असेही त्यांनी सांगितले. 
 

""साखर उत्पादनाबरोबरच इथेनॉल उत्पादनावर साखर कारखान्यांनी भर द्यायला हवा. गेल्या दोन वर्षांत इथेनॉलचे उत्पादन आणि विक्रीत वाढ झाली आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था इथेनॉलवर चालू शकते. यामुळे खनिज तेलाच्या आयातीसाठी लागणारे परकीय चलनाची बचत होऊ शकते. इंधन आयातीसाठी देशाचे सर्वाधिक परकीय चलन खर्च होते. हा खर्च कमी करण्यासाठी इथेनॉलचा वापर वाढविणारे धोरण सरकार आखत आहे. "खाडी का तेल' ऐवजी "झाडी का तेल'ला प्रोत्साहन देण्याने साखर उद्योग आणि ऊस उत्पादक यांनाही उत्पन्नाची शाश्‍वती मिळेल,'' असा विश्‍वास मोदी यांनी व्यक्त केला. 
 

कृषी क्षेत्रात संशोधन-विकासावर भर हवा 
""स्टार्ट अप उद्योगांनी कृषी क्षेत्रात संशोधन, विकास, तंत्रज्ञान विस्तार, बीज संशोधन आदी क्षेत्रांत काम करण्याची आवश्‍यकता आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीव्यवस्थेतून बाजूला येऊन ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन याची कास धरली पाहिजे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन शेती मालाचे उत्पादन वाढेल. यामुळे देशातील अनेक तरुणांना रोजगार मिळेल आणि शेतीच्या विकासाला हातभार लागेल. शेतीसमोरील दुष्काळ, पावसाची अनियमितता, घटत जाणारी जमीन धारणा या आव्हानावर मात करून आपल्याला उत्पादकता वाढवायची आहे,'' असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

Web Title: The agricultural sector "will strengthen the youth to startup india - Modi