पाणी पेरून पाण्याचे पीक घ्या - पंकजा मुंडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

औरंगाबाद - शेतकऱ्यांनी आता पाण्याची शेती करावी. पाणी पेरून पाण्याचे पीक घ्यावे. माध्यम म्हणून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे काम ‘सकाळ अॅग्रोवन’ अतिशय पावित्र्याने करतो आहे. दुष्काळाशी जिद्दीने लढत शेतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी मी स्वतः अॅग्रोवनच्या बरोबरीने काम करण्यास तयार आहे, असा निर्वाळा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिला.

औरंगाबाद - शेतकऱ्यांनी आता पाण्याची शेती करावी. पाणी पेरून पाण्याचे पीक घ्यावे. माध्यम म्हणून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे काम ‘सकाळ अॅग्रोवन’ अतिशय पावित्र्याने करतो आहे. दुष्काळाशी जिद्दीने लढत शेतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी मी स्वतः अॅग्रोवनच्या बरोबरीने काम करण्यास तयार आहे, असा निर्वाळा राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिला.

औरंगाबाद येथील जबिंदा मैदानावर ‘सकाळ अॅग्रोवन’ने आयोजित केलेल्या भव्य कृषी प्रदर्शनाचे उद् घाटन करताना त्या बोलत होत्या. या वेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी उपाध्यक्ष व संचालक के. एम. डीके पाटील, ‘सकाळ’च्या मराठवाडा आवृत्तीचे संपादक संजय वरकड, अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण, आमदार अतुल सावे, राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, सतीश नागरे उपस्थित होते. 

या प्रदर्शनात देवगिरी महानंद, एमआयटी औरंगाबाद, मे. बी. जी. चितळे अॅन्ड सन्स, बागवानी मिशन, आत्मा, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पशुसंवर्धन विभाग यांचा सहयोग असून, अॅन्डस्लाइट, रोहित स्टील वर्क्स हे गिफ्ट पार्टनर, तसेच ड्रिम्स क्रिएशन, ९२.७ बिग एफएम, ओमेगा क्रिएट यांचा ब्रॅंडिंग पार्टनर म्हणून सहभाग आहे.

‘‘अॅग्रोवनशी वाचक म्हणून माझे महाविद्यालयापासून संबंध आहेत. अॅग्रोवनमध्ये पाशा पटेल यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. ती त्यांनी मला आनंदाने दाखविली. तो अंक मी उत्सुकतेने पाहिला व त्यात मला शिरपूर पॅटर्नचा लेख दिसला. या पॅटर्नबाबत मी माहिती घेतली. तेथूनच जलयुक्त शिवारच्या कामांची सुरवात आम्ही केली,’’ असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

‘‘अॅग्रोवनच्या माध्यमातून माहिती मिळाल्यानंतर आम्ही २२ भागांमध्ये खोलीकरणाची कामे केली. त्याला आम्ही वैद्यनाथ पॅटर्न असे नाव दिले होते. विशेष म्हणजे या कामांना पुढे अॅग्रोवनने प्रसिद्धी देत आमचे कौतुक केले,’’ अशा शब्दांत पंकजाताईंनी जलयुक्त चळवळीतील अॅग्रोवनचे महत्त्व स्पष्ट केले. 

सकाळ समूह आदर्श काम करतो
कोणत्याही व्यक्तिकेंद्रित बातम्यांना स्थान न देता सकाळ माध्यम समूह समाजातील आदर्श घडामोडींना डोळ्यांसमोर ठेवून भूमिका घेतो. ‘सकाळ’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांच्याशी मी अनेक वेळा विविध विषयांवर चर्चा करते. अॅग्रोवनची संकल्पना मांडून त्याचे वटवृक्षात रूपांतर करण्याचे काम ‘सकाळ’ने केले आहे. मुद्रित माध्यमात ‘सकाळ’कडून केल्या जाणाऱ्या कामकाजाचा आदर्श इतरांनीदेखील घ्यावा, असे मला वाटते, असे गौरवोद्गार पंकजाताईंनी या वेळी काढले. 

‘‘राज्याला दुष्काळाची मोठी परंपरा आधीपासूनच आहे. यापुढे दुष्काळाशी सामना करावा लागेल. आवडो न आवडो दुष्काळाचे वास्तव स्वीकारूनच पुढे कामे करावी लागतील. यासाठी अॅग्रोवन शेतकऱ्यांच्या सोबत काम करेल,’’ असे प्रतिपादन अॅग्रोवनचे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी केले. 

‘सकाळ’चे संपादक संजय वरकड म्हणाले, की मराठवाड्यातील दुष्काळाशी  सर्व जण जिद्दीने लढत आहेत. या लढाईला साथ देण्यासाठी प्रदर्शनाच्या माध्यमातून ‘सकाळ अॅग्रोवन’ने यंदा मराठवाड्यात कृषी प्रदर्शन भरविले आहे.

शेतकऱ्यांसाठी भूमिका घ्या
फक्त उत्पादकता वाढली म्हणजे शेतकरी समृद्ध होतील असे नाही, हे आजच्याच अॅग्रोवनमध्ये मी वाचले. ते योग्यच आहे. शेती हा ग्रामीण अर्थकारणाचा मोलाचा भाग आहे. त्यामुळे सरकारने शेतक-याला सशक्त करणा-या भूमिका खर्चिक असल्या तरी घेतल्या पाहिजे. शेतक-याला प्रशिक्षण मिळावे. आयात-निर्यात विषयक निर्णय वेळेत घेण्याची आवश्यकता आहे. प्रक्रिया प्रकल्पांना चालना दिली पाहिजे, असा आग्रह पंकजाताईंनी धरला.

...तर आत्महत्यांचा आकडा वाढला असता
कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी अॅग्रोवनच्या उपक्रमांचे तोंड भरून कौतुक केले. अॅग्रोवनमधील यशोगाथा हताश शेतक-यांना उभारी देतात. कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागाच्या कामकाजाला मनुष्यबळाला मर्यादा येतात. अशा वेळी कृषीविषयक ज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रचाराचे मोठे काम अॅग्रोवन करतो. पीकपद्धतील बदल, अभिनव शेतीपुरक उद्योग, आर्थिक उन्नती करणारे प्रयोगशील शेतकरी, अशी विविध माहिती अॅग्रोवन देत असल्यामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना प्रेरणा मिळते. तसे झाले नसते, तर शेतकरी आत्महत्यांचा आकडा मोठा दिसला असता, असे उद्गार कुलगुरूंनी काढले.

Web Title: Agriculture Exhibition Water Crop