राज्याच्या कृषी क्षेत्राला कॅनडाचा आधार - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 जून 2018

मुंबई - कृषी तंत्रज्ञान, मृद व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनाच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर वाढविण्यासोबतच त्यासाठी कॅनडातील क्‍युबेक प्रांताचे अधिकाधिक सहकार्य मिळण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या शिष्टमंडळाने मंगळवारी महत्त्वपूर्ण यश मिळवले.

मुंबई - कृषी तंत्रज्ञान, मृद व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनाच्या क्षेत्रात आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर वाढविण्यासोबतच त्यासाठी कॅनडातील क्‍युबेक प्रांताचे अधिकाधिक सहकार्य मिळण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या शिष्टमंडळाने मंगळवारी महत्त्वपूर्ण यश मिळवले.

आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्षेत्रात काम करणाऱ्या आयव्हीएडीओ, नेक्‍स्ट एआय आणि एफआरक्‍यूएनटी संस्थांचे सहकार्य महाराष्ट्राला लाभणार असून, राज्यात आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्‍लस्टर्सची उभारणी होणार आहे. कॅनडामधील मॉन्ट्रिएल येथे क्‍युबेकच्या उपपंतप्रधान श्रीमती डॉमनिक अँग्लेड आणि मुख्यमंत्री यांच्यात आज "आर्टिफिशियल इंटिलिजन्स' या तंत्रज्ञानाचा विविध क्षेत्रांत वापर करण्याबाबत चर्चा झाली. महाराष्ट्राने पायाभूत सुविधा क्षेत्रात घेतलेल्या भरारीची श्रीमती अँग्लेड यांनी प्रशंसाही केली.

सामंजस्य करार
क्‍युबेक सरकारचा निसर्ग तंत्रज्ञानविषयक उपक्रम असलेली "एफआरक्‍यूएनटी' संस्था आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात क्‍युबेक सिटी येथे सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या कराराप्रमाणे कृषी क्षेत्रात काम करण्यासाठी एक आंतरराष्ट्रीय अभ्यास गट स्थापन करण्यात येणार आहे. या क्षेत्रातील नेक्‍स्ट एआय संस्थेसोबतच्या सामंजस्य करारावरदेखील स्वाक्षरी करण्यात आली. राज्यातील 50 स्टार्टअपना सहकार्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत "नेक्‍स्ट एआय' काम करणार आहे.

आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्‍लस्टर्स
क्‍युबेकमधील इन्स्टिट्यूट ऑफ डाटा व्हॅलोरायझेशनच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्षेत्रातील सुमारे एक हजार संघटना एकत्रित काम करीत असून, यातून मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. राज्याचा माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि आयव्हीएडीओ यांच्यात महाराष्ट्रात आर्टिफिशियल एक्‍सलेटर्सच्या स्थापनेबाबत या वेळी विचारविनिमय करण्यात आला. या वेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते.

कॅनडा भेटीतील फलप्राप्ती
 आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्‍लस्टर्सची उभारणी होणार
 नेक्‍स्ट एआय आणि एफआरक्‍यूएनटीसोबत सामंजस्य करार
 कृषी तंत्रज्ञान, मृद व्यवस्थापन आणि कीड निर्मूलनासाठी मदत
 मुख्यमंत्र्यांची कॅनडातील नेते- उद्योगजगताशी सकारात्मक चर्चा

Web Title: agriculture field canada support devendra fadnavis