कौशल्य विकासातून शेती होणार शाश्‍वत - देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

मुंबई - प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रयोगशील शेतीबाबत प्रशिक्षण मिळणार आहे. हा उपक्रम पथदर्शी प्रकल्प ठरणार असून, यामुळे शेती क्षेत्रात परिवर्तन घडण्यास मदत होणार असून, कुशल बळिराजा आधुनिक आणि शाश्‍वत शेतीविकासासाठी सज्ज होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. राज्यातील तीन लाख युवकांना या अभियानातून प्रशिक्षण मिळणार आहे.

मुंबई - प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक आणि प्रयोगशील शेतीबाबत प्रशिक्षण मिळणार आहे. हा उपक्रम पथदर्शी प्रकल्प ठरणार असून, यामुळे शेती क्षेत्रात परिवर्तन घडण्यास मदत होणार असून, कुशल बळिराजा आधुनिक आणि शाश्‍वत शेतीविकासासाठी सज्ज होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले. राज्यातील तीन लाख युवकांना या अभियानातून प्रशिक्षण मिळणार आहे.

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संस्थेच्या छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानाचे उद्‌घाटन फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले.

त्या वेळी कृषिमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृषी व जलसंधारण सचिव एकनाथ डवले, कौशल्य विकास सचिव असीम गुप्ता, कौशल्य विकास आयुक्त वीरेंद्र सिंह आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘नानाजी देशमुख कृषी साह्य योजना आणि ॲग्री बिझनेस याबाबत माहिती मिळविणे, या योजनांचा लाभ घेणे, शेती बाजाराशी समन्वय करणे आणि शेतीतील उत्पादकता वाढविणे या प्रशिक्षण कार्यक्रमातून शक्‍य होणार आहे. प्रधानमंत्री कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत शेतकरी कुशल प्रशिक्षणामुळे गटशेतीतून कौशल्य विकास करणे शक्‍य होणार आहे.

प्रगत तंत्रज्ञान आधारित शेती पद्धतीमुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणे शक्‍य होणार आहे. गेल्या काही वर्षांत शेतीमध्ये होत असलेले बदल, पावसाची अनियमितता यामुळे शेतीची शाश्वतता कमी होत आहे.

पिके चांगली येण्यासाठी वापरण्यात येत असलेली अधिकची रासायनिक खते, वाढलेले बाजारभाव हे सगळे पाहता कृषी क्षेत्रात प्रशिक्षण मिळणे आवश्‍यक आहे. कौशल्य विकास विभागामार्फत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामुळे शाश्वत शेतीकडे आपल्याला जाणे शक्‍य होणार आहे.’’

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य आधारित प्रशिक्षण दिले जाणार असून, याचा लाभ जवळपास तीन लाख युवकांना होणार आहे. राज्यातील शेतकरी आणि तरुणांसाठी स्वयंरोजगार आणि व्यवसायाकरिता संधी निर्माण होण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याचे संभाजी पाटील-निलंगेकर यांनी सांगितले.

‘सिमॅसिस लर्निंग एलएलपी’ आणि ‘पॅलेडियम कन्सल्टिंग इंडिया प्रा. लि.’ हा जागतिक पातळीवरील तज्ज्ञ समूह या कार्यक्रमाची राज्यात अंमलबजावणी करणार आहे.

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानात शेतकऱ्यांना कृषी आधारित कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्यामुळे गावामध्येच रोजगार निर्मिती होण्याबरोबर शेतकऱ्यांच्या कुटुंबातील तरुण तरुणींना याचा प्रत्यक्ष लाभ घेण्यास मदत होणार आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता आणि कौशल्य विकास अभियानातून प्रशिक्षित शेतकऱ्यांची फौज उभी राहणार आहे. राज्याच्या शेती क्षेत्रात हे क्रांतिकारी पाऊल आहे. शेतकऱ्यांना जगाच्या स्पर्धेत मजबुतीने उतरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. 
- संभाजी पाटील-निलंगेकर, कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री

प्रकल्पाविषयी थोडक्‍यात
 तीन लाख युवकांना प्रशिक्षण 
 जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान मिळणार 
 गटशेतीतून समूह विकासाला चालना 
 एकूण १६ महिन्यांचा खास प्रकल्प 
 ३४ जिल्ह्यांत टप्प्याटप्प्याने सुरवात, पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर व मराठवाड्यातील लातूर, बीड, नांदेड जिल्ह्यांचा समावेश 
 पहिल्या दिवशी पीक उत्पादनातील आधुनिक तंत्रज्ञान, शेतमाल प्रक्रिया दुसऱ्या दिवशी गटशेती कशासाठी, त्याचे महत्त्व व ती कशी करावी, शेतकरी उत्पादक कंपनी, ओळख आणि व्यवस्थापन व तिसऱ्या दिवशी शेतमाल मूल्यवर्धन साखळी, शेतमालाचे मार्केट लिंकेजेस याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शन करतील.

प्रशिक्षणार्थींना मिळणारे फायदे
 गटशेती प्रवर्तक म्हणून शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र 
 दोन वर्षांपर्यंत दोन लाखांचा अपघाती विमा 
 अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या शासकीय योजनांचा प्राधान्याने लाभ

Web Title: Agriculture will be sustainable through skill development Devendra Fadnavis