नव्या तंत्राची बीजे पेरत प्रदर्शनाची सांगता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

औरंगाबाद - शहरातील जबिंदा मैदानावर आयोजित सकाळ-अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला चार दिवसांच्या कालावधीत हजारो शेतकरी, नागरिकांनी उपस्थिती लावून कृषी ज्ञानाची भूक भागवली. कृषी क्षेत्रात येत असलेले नवनवीन यंत्र, तंत्र, प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या साधनांची तर माहिती घेतलीच शिवाय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचीही खरेदी केली. 

औरंगाबाद - शहरातील जबिंदा मैदानावर आयोजित सकाळ-अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाला चार दिवसांच्या कालावधीत हजारो शेतकरी, नागरिकांनी उपस्थिती लावून कृषी ज्ञानाची भूक भागवली. कृषी क्षेत्रात येत असलेले नवनवीन यंत्र, तंत्र, प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या साधनांची तर माहिती घेतलीच शिवाय शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचीही खरेदी केली. 

या प्रदर्शनासाठी देवगिरी महानंद, एमआयटी औरंगाबाद, मे. बी. जी. चितळे अँड सन्स, बागवानी मिशन, आत्मा, कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पशुसंवर्धन विभाग यांचा सहयोग होता. अँडस्लाइट, रोहित स्टील वर्क्स हे गिफ्ट पार्टनर; तसेच ड्रिम्स क्रिएशन, ९२.७ बिग एफएम, ओमेगा क्रिएट हे ब्रॅंडिंग पार्टनर म्हणून सहभागी झाले होते. प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशी पहिल्या तीन दिवसांप्रमाणेच मोठी गर्दी उसळली होती.

गेल्या तीन दिवसांपासून इतर भागांप्रमाणेच मराठवाड्यात थंडीचे प्रमाण वाढलेले आहे. दिवसभर बोचरी थंडी असतानाही या प्रदर्शनाला शेतकरी गटागटाने येत होते. थंडीचा कुठलाही परिणाम शेतकऱ्यांवर झाला नव्हता.  
मराठवाड्यात सकाळ-अॅग्रोवनने औरंगाबाद शहरात आजवरचे सर्वात मोठे कृषी प्रदर्शन आयोजित केल्याने शेतकरी; तसेच महिला बचत गटांसाठी एक प्रकारे माहितीचे दालन उघडले असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी या ठिकाणी व्यक्त केल्या.  

प्रदर्शनात शेवटच्या दिवशी किफायतशीर बांबू शेती आणि नावीन्यपूर्ण विविध उत्पादने, फळबागातून समृद्धी या विषयांवर परिसंवाद झाले. राजशेखर पाटील, योगेश शिंदे यांनी पहिल्या आणि दुसऱ्या परिसंवादात सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी, संजय मोरे पाटील यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या दोन्ही परिसंवादांना शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. प्रदर्शनाला शनिवारी सायंकाळी जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी डोणगावकर यांनी, तर समारोपाच्या दिवशी महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टीसाइड सीडस डीलर्स असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांसाठीच्या या उपक्रमाचे कौतुक केले. रविवारी सायंकाळी उशिरापर्यंत हे प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी कायम होती. पुढील वर्षीदेखील सकाळ-अॅग्रोवनने या ठिकाणी कृषी प्रदर्शन आयोजित करावे, अशा प्रकारच्या भावना बहुतांश शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Agrowon Agriculture Exhibition Send up