विमानतळ परिसरातील पार्किंग शुल्क वाजवी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुंबई - विमानतळ परिसरात येणाऱ्या वाहनांना सुरक्षेच्या कारणास्तव पार्किंगचे शुल्क देणे बंधनकारक आहे; मात्र कोणतीही अवास्तव शुल्कवसुली विमानतळ व्यवस्थापनाकडून करण्यात येत नाही, असे स्पष्टीकरण मुंबई उच्च न्यायालयात आज प्रतिज्ञापत्राद्वारे देण्यात आले. 

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी अखिल चित्रे यांनी केलेल्या जनहित याचिकेवर मुख्य न्या. मंजुळा चेल्लूर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये व्यावसायिक वाहनांकडून जादा आणि गैरप्रकारे शुल्कवसुली केली जात आहे, असा आरोप याचिकादाराने केला आहे. मात्र आज न्यायालयात व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात या आरोपांचे खंडन केले आहे. विमानतळ परिसरात येणाऱ्या वाहनांकडून वेळेनुसार पार्किंगचे शुल्क वसूल केले जाते. येथील परिसर संवेदनशील असून कडेकोट सुरक्षा व्यवस्था असते. जर शुल्कआकारणी नसली तर इथे गोंधळ उडू शकतो, त्यामुळे किमान रुपये 110 शुल्क आकारले जाते, असे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. 

पार्किंगसाठी येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्यामुळे तेथे काटेकोर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच अन्य विमानतळांच्या तुलनेत मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे शुल्कही कमी आहे आणि उपलब्ध असलेली जागाही मर्यादित आहे, असेही प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे. याचिकेवर पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.

Web Title: Airport parking fees