Ajit Pawar : सरकारवर अजित पवारांचे शरसंधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar alleged state government imposing schemes worth crores  wasting public tax money beautification and advertising

Ajit Pawar : सरकारवर अजित पवारांचे शरसंधान

मुंबई : राज्य सरकार कोट्यवधी रुपयांच्या योजना महापालिकांवर लादत असून जनतेच्या करातून मिळालेल्या पैशाची सुशोभीकरण आणि जाहिरातींवर उधळपट्टी सुरू असल्याचा आरोप करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी राज्य सरकारच्या कारभारावर शरसंधान साधले.

निवडणुकीच्या तोंडावर मुंबई महानगरपालिकेच्या पैशांवर कितीही कामे सुरु करा. मुंबईकर निवडणुकीत एक -एक पैशाचा हिशेब तुमच्याकडून घेतील, हे मात्र विसरू नका, असा इशाराही अजित पवार यांनी दिला.

विरोधी पक्षांच्या नियम २९३ अन्वये अजित पवार यांनी, नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण या विभागांसंदर्भात विधानसभेत प्रस्ताव मांडला. अजित पवारांनी नगरविकास विभागाला लक्ष केले होते.

विशेष करून मुंबई महापालिकेमध्ये प्रशासकांच्या माध्यमातून सुरू असलेल्या हस्तक्षेपावरून त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. प्रशासकांच्या माध्यमातून सुरु असलेला राज्य सरकारचा हस्तक्षेप तत्काळ थांबला पाहिजे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासनिधीतून मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातींवर होत असलेली उधळपट्टी थांबली पाहिजे. आम्ही केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करून काहीही फरक पडणार नसल्याचा टोला त्यांनी सरकारला मारला.

शहरातील नागरी सुविधांचा अभाव, रस्त्यावरील खड्डे, वाहतूक कोंडी, कायदा-सुव्यवस्था, निधीची उधळपट्टी, जाहिरातबाजी, केंद्राकडील प्रलंबित निधी आदी मुद्दे उपस्थित करून सरकारला कोंडीत पकडले.

मुंबईत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र असलेली जाहिरात अजित पवार यांनी सभागृहात दाखवली. त्या जाहिरातीतील कामे शिवसेनेची सत्ता असताना झालेली आहेत. पण श्रेय मात्र मुख्यमंत्री लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केली. या जाहिरातीत आणखी एक आक्षेपार्ह विधान आहे.

‘निर्धार सरकारचा, कायापालट मुंबईचा,’ या ओळींच्या खाली इंग्रजीत ‘इनिशिअेटिव्ह बाय एकनाथ शिंदे, हॉनरेबल सी.एम.’ असे प्रसिद्ध केले आहे. पैसा मुंबई महानगरपालिकेचा, मुंबईकरांच्या करातून आलेला. यात सरकारचा एक रुपया नाही. जाहिराती मात्र मुख्यमंत्र्यांच्या, हा काय प्रकार आहे?, असा मुद्दा पवार यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिला.

राज्यातील जनता सर्व पाहत आहे

अलीकडेच शिवसेना (ठाकरे गट) नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला. या मुद्द्यावर बोलताना भाजप आमदार रमेश पाटील यांनी विधानपरिषेदत बोलताना ‘‘आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे.

ती गुजरातमधून येते. त्यामुळे जो माणूस आमच्याकडे येणार तो स्वच्छ होतो, असे विधान केले. त्याचा संदर्भ घेत विधानसभेत अजित पवार म्हणाले, की काही सदस्यांच्या चौकशा सुरु होत्या, पण एकनाथ शिंदेंबरोबर भाजपच्या सरकारमध्ये गेल्याने त्या बंद झाल्या. ते लगेचच स्वच्छ होऊन धुतल्या तांदळासारखे झाले.

पावडरच्या उल्लेख करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांना उद्देशून ‘तुमच्याकडेही पावडर आहे, असे म्हटले. याला प्रत्युत्तर देताना पवारांनी यांनी सांगितले की, आमच्याकडे कोणतीही पावडर नाही. तुम्ही राज्याचे प्रमुख आहात. या प्रकरणाला कमी लेखू नका. आपण चेष्टेने घेतो. पण, राज्यातील जनता हे सर्व पाहत असते.”

अजित पवारांचा घणाघात

  • सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी, शासकीय रुग्णालयांनी शासनाकडे औषधांसाठी मागणी पत्र सादर केलेली आहेत. मात्र, पुरवठा होत नाही. सर्वच विभागांना लागणारी औषधे आणि यंत्रसामग्री हाफकीनकडून खरेदी करण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१७मध्ये झाला होता. हाफकीनकडून औषधांचा पुरवठा वेळेत होत नसल्याने औषधांचा तुटवडा निर्माण झाला. हा प्रश्न सोडवण्याऐवजी औषध खरेदीचे अधिकार आपल्या विभागाला मिळण्यासाठी शिंदे गटातील मंत्र्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

  • राज्यात, इन्फ्लूएंझा एच३एन२ या विषाणूचा प्रभाव वाढलेला आहे, हे सरकारनेही मान्य केले आहे. नगर आणि नागपूर येथे दोघांचा मृत्यू झाला. तापाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. सरकारने मोफत चाचणी सुविधा वाढवल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे सर्व जिल्ह्यांचे रोजचे अहवाल मागवून त्यावर लक्ष ठेवले पाहिजे. इन्फ्लूएंझा असेल किंवा करोना असेल, प्रतिबंधात्मक उपाययोजना सरकारने तातडीने कराव्यात.

  • निवासी डॉक्टरांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. या सर्व प्रश्नांबाबत सरकारने नेमकी कोणती पावले उचलली, आश्वासनांची पूर्तता कधी होणार, याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी.

टॅग्स :Ajit Pawar