शेतकर्‍यांची जाणीव नसलेले हे सरकार आहे- अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

- सरकारने केवळ गाजर दाखविले
- पुरात अनेकांचे बळी, लाखोंचा पोशिंदा उपाशी 

नगर ः "राज्यात आलेल्या पूरस्थितीत अनेकांचे बळी गेले. या सरकारच्या काळात 15 हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. बेरोजगारी आणि तरुणांची वणवण वाढली. उद्योगधंद्यांत मंदी आली. पाच वर्षांच्या काळात सरकारने काय केले, फक्त आश्‍वासनाचे गाजर दाखविले, राज्याला कर्जबाजारी केले, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. 

"नव्या स्वराज्याचा नवा लढा' या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेत ते बोलत होते. खासदार डॉ. अमोल कोल्हे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, अंकुश काकडे, आमदार संग्राम जगताप, अरुण जगताप आदी उपस्थित होते.

आज सकाळी यात्रेचा प्रारंभ जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. पवार म्हणाले, ""शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्राला न परवडणाऱ्या आहेत. महागाईने आधीच जनता होरपळत आहे. ऐपत नाही, त्यांना टॅक्‍स लावणे चुकीचे आहे. सरकारने याचे भान बाळगावे. राष्ट्रवादीचे सरकार आल्यावर युवकांना 75 टक्के नोकऱ्या दिल्या जातील, जो कारखाना नोकऱ्या देणार नाही, तो कारखाना चालवू देणार नाही.'' 

विधानसभेला सरस उमेदवार देणार 
आगामी विधानसभेसाठी राज्यातील सर्व पुरोगामी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढणार आहोत. निवडणुकीसाठी एकाचढ एक असे सरस उमेदवार देऊ. त्यामुळे राज्यात सरकार आणून राज्य सुजलाम्‌ सुफलाम्‌ करणार असल्याचा निर्धार पवार यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit pawar Criticise BJP Government in Shivswarajya Yatra