
Ajit Pawar : हे कसले गतिमान सरकार? : अजित पवार
नाशिक : ‘‘सरकार शक्तिहीन असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. त्यामुळे हे सरकार कसले गतिमान? अशा शब्दांमध्ये विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी गुरुवारी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.
जाहिरातींसाठी ७५ कोटी खर्च केले असताना ५०० कोटींची तरतूद केली जात असल्यास हे सर्वसामान्यांचे सरकार कसे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना पवार म्हणाले, की सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलेल्या मताची नोंद महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी.
शिवाय जनतेला आवडत नसले, तरीही जाहिरातींतून आमचे छायाचित्र बघा असा खटाटोप चालला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून औषधे आणि उपचारांसाठी २८ कोटी खर्च झाले, असे सांगितले जाते. त्याऐवजी जाहिरातींसाठीचे ५०० कोटी गरिबांसाठी खर्च करायला हवे होते. भांडवलदारांचे ११ लाख १० हजार कोटी कर्ज माफ केले. मात्र शेतकऱ्यांना न्याय देता येत नाही.
जाती-धर्मांमध्ये सलोखा ठेवा
वाचाळवीरांची संख्या वाढली आहे, कायदा-सुव्यवस्थेचे बारा वाजले आहेत, असे आरोप करीत जाती-धर्म-पंथांमध्ये सलोखा ठेवण्यास महापुरुषांनी सांगितले आहे, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. मात्र सणांच्यानिमित्ताने राजकीय पोळी भाजून घेतले जाते, असे सांगून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयीच्या वक्त
व्यांवर पवार बोलले. ते म्हणाले, की सावरकरांचे कार्य तरुण पिढीला ऊर्जा देणारे आहे. तरीही त्यांच्याविषयी बोलले गेले. त्याबद्दल सांगण्यात आल्यावर बोलणार नाही असे ‘त्यांनी’ (काँग्रेसचे नेते राहुल गांधी) सांगितले. तरीही गौरव यात्रा काढणार म्हणतात.
मग आता प्रश्न पडतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी अपमान केला तेव्हा गौरवयात्रा का काढली नाही? निवडणूक आयोगाने ‘शिवसेना’ नाव आणि चिन्ह काढून घेतले. हे जनतेला रुचलेले नाही. उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क, मालेगाव आणि खेडच्या सभेला शेवटपर्यंत थांबलेल्या जनतेतून हे स्पष्ट होते.
वामनदादा कर्डकांच्या कुटुंबीयांना मदत
लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या कुटुंबीयांना सदनिकेसाठी दीड लाख रुपयांची मदत मेट भुजबळ नॉलेज सिटी, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यातर्फे देण्यात आली. अजित पवार यांच्या हस्ते कर्डक कुटुंबीयांना धनादेश सुपूर्द करण्यात आला.
महाविकास आघाडी आपल्या सोबत आहे. मात्र पद घ्यायचे आणि काम करायचे नाही अशांना मुक्त करा.
- अजित पवार विरोधीपक्षनेते, विधानसभा