सरकारला अजून किती बळी हवेत?- अजितदादांचा संतप्त सवाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

शेतकरी मोडला, तर राज्य मोडेल- अजित पवार

विधानसभेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसनेसह 150 पेक्षा जास्त आमदार कर्जमाफीची मागणी करत आहेत. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. त्यामुळे बहुमताचा आदर करुन ताबडतोब कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी अजित पवार यांनी केली.

अजून किती बळी हवेत सरकारला?- अजितदादा संतापले

मुंबई : 'किती बळी हवे आहेत अजून सरकारला..?' असा सवाल करीत अजित पवार विधानसभेत संतापले. 'कर्जमाफीची घोषणा करा, तरच सभागृहाचे कामकाज चालू देणार' असा इशारा त्यांनी यावेळी सरकारला दिला. 

'कर्जात बुडालेला शेतकरी तुमच्याकडे आशेने डोळे लावून बघत आहे. चंद्रकांतदादा, तुम्ही सरकारमधील दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री आहात. लगेच उठून कर्जमाफी देतो म्हणून घोषणा करा. आम्ही सर्वजण तुम्हाला मुख्यमंत्री बनण्यासाठी पाठिंबा देतो. तुम्हाला डोक्यावर घेतो," असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची जोरदार मागणी केली.

सरकारने जनाची नाही तरी मनाची लाज बाळगावी, असे सांगत राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर थेट हल्ला केला. अजित पवार म्हणाले, रोज 10-12 शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ऊस, सोयाबीन, तुरीसह फळबागा आणि सर्वच शेतमालाचे वाटोळे सरकारच्या धोरणामुळे झाले आहे. जाहिरातींवर हजारो कोटींची उधळपट्टी सुरु आहे. उद्योगपतींनाही हजारो कोटींची माफी मिळते. उद्योगपती विजय मल्ल्या कर्ज बुडवून लंडनमध्ये मजा मारतो. मग शेतकऱ्यांनीच कोणते पाप केले आहे, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. 

विधानसभेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसनेसह 150 पेक्षा जास्त आमदार कर्जमाफीची मागणी करत आहेत. शेतकरी मोडला तर राज्य मोडेल. त्यामुळे बहुमताचा आदर करुन ताबडतोब कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी त्यांनी केली. विरोधात असताना आरोप करणारे आता मंत्र्यांना आता लाल दिव्याची उब लागली आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणारे सरकार दळभद्री आहे, असा घणाघात त्यांनी केला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडेंनी कामकाज पुढे पुकारले.  

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच सुरू झाले आहे. शेतकरी कर्जमाफीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर धरणे आंदोलन केले. अधिवेशनाच्या सुरवातालीच जोरदार फटकेबाजी करीत अजित पवार यांनी सरकारला कोंडीत पकडले. यावेळी आमदारांनी खिशातील राजीनामे कोठे गेले, अशी घोषणाबाजी केली. 

उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे सरकार आल्यास तेथील शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, अशी घोषणा भाजपने विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान केली आहे. त्या पार्श्वभूमीवर दुष्काळ आणि अनिश्चित बाजारभावाच्या संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून करण्यात येत आहे.

मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना कर्जाचा बोजा कमी होईल अशी आशा आहे, असे सांगत राज्य सरकारला अजित पवार यांनी धारेवर धरले. सत्ताधारी आमदार, मंत्र्यांकडे निर्देश करीत ते म्हणाले, "तुम्ही विरोधात असताना तुमची भाषणं वेगळीच असायची. आणि आता सत्तेची ऊब मिळू लागली की तुमची भाषा बदललीय.
अध्यक्षसाहेब, तुम्हाला आम्ही हात जोडून विनंती करतो की शेतकऱ्यांकडे पाहा. तुम्ही औरंगाबादचे आहात. तुम्ही तरी यामध्ये लक्ष घाला," असे म्हणत अजितदादांनी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे लक्ष वेधून घेतले. "कृषिमंत्री यावर काहीतरी बोला... तुम्ही तर हे सोडून वेगळ्याच विषयांवर बोलता," शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनाही त्यांनी लक्ष्य केले. 

Web Title: ajit pawar demands loan waiver to farmers