
Ajit Pawar : "इतिहासात असं कधीही झालं नाही..." ; अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अजित पवारांनी व्यक्त केली खंत!
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर विधानसभेत गदारोळ झाला. प्रश्नांची उत्तरे द्यायला, मंत्री सभागृहात उपस्थित नसल्यामुळे विरोधक चांगलेच संतापले. यावेळी विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेतून सरकारवर हल्लाबोल केला.
अजित पवार म्हणाले, हे अधिवेशन माझ्या राजकीय कारकिर्दीतील पहिले अधिवेशन असले. सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री यांची उपस्थिती नगन्य होती. आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र मंत्री उपस्थित नसल्यामुळे लक्षवेधी राखून ठेवण्याची वेळ अध्यक्षांवर अनेकवेळा आली. आम्ही सत्तेत असताना सभागृहात हजर राहायचो. आता देखील आम्ही रात्री ११ पर्यंत हजर राहायचो.
आज दोन्ही सभागृहात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री २९२ अंतिम आठवडा प्रस्ताव आणि १९४-३-४ चं उत्तर आज देत आहेत. महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासात असं कधीही झालं नाही. हे अतिशय बेजबाबदारपणाचे काम होत. मी कुणावर आरोप करत नाही पण हा सरकारचा बेजबाबदारपणा असल्याचे अजित पवार म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काम असतात पण मंत्री देखील हजर नव्हते. फ्रेश होऊन येतो म्हणून मंत्री जायचे आणि यायचेच नाही. यांना सत्ता पाहिजे पण काम करायचे नाही. सत्ताधारी पक्षाची पुढची रांग पूर्णपणे रिकामी असायची. हे लोकशाहीसाठी घातक आहे, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, कोडगेपणाचा कळस या अधिवेशनात पाहायला मिळाला. लक्षवेधीचा तर उच्चांक झाला. मंत्रिमंडळाचा देखील विस्तार झाला नाही. महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. सत्तारूढ पक्षाने विधिमंडळाच्या आवारात राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले. हे विधिमंडळाच्या पावित्र्याचे भंग करणारं होतं. त्यांचा आम्ही निषेध करतो. मागणी करून देखील संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही.