Ajit Pawar : भर विधानसभेत अजित पवारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर जोडले हात; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit Pawar : भर विधानसभेत अजित पवारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर जोडले हात; म्हणाले...

राज्यात गेले काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हात जोडले.

सभागृहात बोलताना अजित पवार म्हणाले की, "आपण अधिवेशन करतोय. गेल्या आठ दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस होतोय. यामुळे पिकांचं आणि फळबागांचं अतोनात नुकसान होत आहे. गारपिटीमुळे तर काही ठिकाणी गारांचा गालिचा अंथरला गेला आहे. अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. यलो अलर्ट दिलेला आहे. अग्रलेख यायला लागले आहेत, पण सरकार संवेदनशील आहेत का हे कळायला मार्ग नाही."

तर पुढे बोलताना अजित पवारांनी राज्याच्या कृषिमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. "अब्दुल सत्तारांनी तारे तोडले की अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं फार नुकसान झालेलं नाही. इकडे राज्याचे तत्पर मुख्यमंत्री कुणाचाही फोन उचलतात आणि त्यांचे वाचाळ मंत्री शेतकऱ्यांची कुचेष्टा करतात. कसं चालेल? आम्हीही शेतकऱ्यांचं प्रतिनिधीत्व करतो. सरकारने तातडीने पंचनामे करून मदत केली पाहिजे. हातातोंडाशी आलेला पिक जर शेतकऱ्यांचं गेलं, तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचं कुणाला? शेतकऱ्यांनी पाहायचं कुणाकडे? यंत्रणा हलायला हवी होती" असं म्हणत अजित पवारांनी कृषिमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे.

तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर बोलताना पवार म्हणाले कि, "संप असल्याने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी जात नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. असं झाल्यावर तो बिचारा आत्महत्येपर्यंत मजल मारतो. आत्महत्या करण्यापर्यंत तो प्रवृत्त होतो. माझी हात जोडून विनंती आहे की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हे गांभीर्य घेण्याची गरज आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केलेली मदत तुटपुंजी आहे. शेतकरी जगाला तर राज्य जगेल", असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हंटलं आहे.