Ajit Pawar: अजितदादा CM शिंदेंवर नाराज? देवगिरीवरील बैठकीत काय झालं? तटकरेंनी स्पष्ट सांगितलं... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit Pawar: अजितदादा CM शिंदेंवर नाराज? देवगिरीवरील बैठकीत काय झालं? तटकरेंनी स्पष्ट सांगितलं...

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तातडीने दिल्लीला गेले. तर दुसरीकडे अजित पवार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील गेले नाहीत. अजित पवार आजारी असल्याची माहिती देण्यात आली मात्र राजकीय घडामोडींना वेग आहे.

या सर्व प्रकरणावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. तटकरे म्हणाले, प्रकृती बरी नसल्याने अजित पवार कुठल्याही बैठकीला हजर नाहीत. आजच्या देवगिरी बंगल्यावरील बैठकीला देखील ते उपस्थित नव्हते. आज फक्त आमदारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

देवगिरी बंगल्यावर झालेली बैठक नेहमी होत असते. मतदारसंघातील विकास कामावर या बैठकीत चर्चा होत असते. अजित पवार यांची तब्येत ठिक नसल्यामुळे ते बैठकीत हजर नव्हते. अजित पवार नाराज नाहीत. विरोधक ही अफवा पसरवत आहेत. विरोधक जाणीवपूर्वक हे काम करत आहेत, असे तटकरे म्हणाले.

सुनील तटकरे म्हणाले, केवळ गैरसमज, अफवा पसरवल्या जात आहेत. दिल्लीला राष्ट्रवादीकडून कोणीही गेलं नाही?, यावर तटकरे म्हणाले ही बैठक नियोजित होती की नाही हे मला माहित असण्याच कारण नाही. मात्र अजित पवार यांची प्रकृती ठीक नाही.

अमित शाहांच्या दौऱ्यावेळी अजित पवार गैरहजर?

सुनील तटकरे म्हणाले, अजित पवार यांचा पूर्वनियोजीत बारामतीचा दौरा असल्यामुळे अजित पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली नव्हती. अजित पवार यांनी हे पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. तसेत अमित शाह यांना देखील माहिती दिली होती.

दादा मुख्यमंत्र्यांवर नाराज?

अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी गणेश दर्शनाला गेले नव्हते यावर तटकरे म्हणाले, "अजित पवार देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर गेले होते. मी तिथं उपस्थित होतो. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा बंगल्यावर नव्हते. त्यावेळी आम्ही तिघेही तिथं जाणार होतो. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी बोलावलं. त्यावेळी आम्ही गेलो मात्र अजितदादांचा नियोजित दौरा होता. त्याची कल्पना मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली होती."