
Ajit Pawar: अजित पवारांचं शिंदे-फडणवीस सरकारला पुन्हा पत्र; केली महत्वाची मागणी
महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी, अशी मागणी, राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच केली आहे.
अजित पवार यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, "महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी,अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रामार्फत केली आहे."
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र दिनीच ही घोषणा होईल, यासाठी प्रयत्न करावेत. केंद्र सरकारनं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन महाराष्ट्र दिनी महाराष्ट्राला अमृतकाळातील भेट द्यावी.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी महाराष्ट्राकडून केंद्र सरकारकडे गेली १० वर्षे सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील भाषा, संस्कृती तसंच साहित्यविषयक संस्थाही त्या संदर्भात वेळोवेळी सनदशीर मार्गानं आवाज उठवत आहेत.
अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करीत असल्याचं एकूण परिस्थिती पाहता स्पष्ट झालं आहे. साहित्य अकादमी, सांस्कृतिक मंत्रालयापासून सर्व संबंधित विभागांनी त्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. फक्त केंद्रीय मंत्रिमंडळानं शिक्कामोर्तब करणं बाकी आहे."
दरम्यान मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सन 2012 पासून महाराष्ट्र शासन प्रयत्नशिल असून याबाबत भारत सरकारकडे सतत पाठपुरावा करीत आहे.
राज्यशासनाने याप्रश्नी नियुक्त केलेल्या प्राध्यापक रामनाथ पठारे समितीने महत्वाच्या ऐतिहासिक पुराव्यांसह सर्व समावेशक अहवाल केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील सांस्कृतिक मंत्रालयात यापूर्वीच सादर केला आहे; परंतु केंद्र शासनाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जास अद्याप मान्यता दिलेली नाही.
आत्ता पर्यंत अनेक नेत्यांनी केंद्र सरकारला पत्राच्या माध्यमातून विनंती केली मात्र अजून पर्यंत सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.