चाकण हिंसाचार : दिलीप मोहिते-पाटील यांना वाचविण्यासाठी अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जुलै 2019

- चाकण दंगल प्रकरणी खेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या अटकेची शक्यता

मुंबई : चाकण दंगल प्रकरणी खेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या अटकेची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना वाचवण्यासाठी अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या दंगल प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हायला हवा. विनाकारण कोणाला टार्गेट करु नका, असेही अजित पवार यांनी सांगितले. 

चाकण दंगल प्रकरणी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो आहे. याठिकाणी वातावरण चिघळण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हायला हवा. विनाकारण कुणाला टार्गेट करु नका, असेही अजित पवार यांनी सांगितले. 

मराठा क्रांती मोर्चादरम्यान 30 जुलै 2018 रोजी चाकणमध्ये मराठा समाजाने मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात मोठा हिंसाचार झाला होता. एसटी बसेससह खासगी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली होती. मोर्चेकरी आणि पोलिसांमध्येही त्यावेळी चकमक झाली होती. या हिंसाचाराची झळ पोलिसांनाही सहन करावी लागली होती. हिंसाचार थांबल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई केली. ज्यामध्ये गुन्हे दाखल करुन 84 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली.

आता याच हिंसाचाराचा ठपका दिलीप मोहिते-पाटील यांच्यावर ठेऊन त्यांच्या अटकेची कारवाई केली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिलीप मोहिते पाटील यांच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar Meet CM Devendra Fadnavis to Save Dilip Mohite Patil