
HSC Exam 2023 : पुन्हा म्हणतात, दादा बोलतात! पेपर फुटीवरुन अजित पवारांचा सभागृहात संताप
मुंबईः बुलडाण्यामध्ये बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेआधीच फुटल्याची माहिती आहे. हे प्रकरण थेट सभागृहात पोहोचलं असून विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
सध्या बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. आज गणिताचा पेपर आहे. मात्र सकाळी साडेदहा वाजता सोशल मीडियावर पेपर व्हायरल झाला. 'साम टीव्ही'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. गणिताचा पेपर परीक्षेआधीच अनेक विद्यार्थ्यांकडे पोहोचल्याचा संशय आहे. सिंदखेडराजा येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. याबाबतची अधिकृत माहिती प्रशासकीय यंत्रणेकडून मिळालेली नाही.
हेही वाचाः बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
हाच मुद्दा घेऊन अजित पवार यांनी सरकारला खडे बोल सुनावले. अजित पवार म्हणाले की, परीक्षेचे पेपर असे फुटत असतील तर सरकार काय झोपा काढतंय का? पुन्हा म्हणतात दादा बोलतात, दादा बोलतात... परंतु अभ्यास करणाऱ्या मुलांचं यामुळे वाट्टोळं होतं. सरकारने याप्रकरणी कारवाई करावी, असा मुद्दा त्यांनी मांडला.
सभागृहामध्ये शिक्षणमंत्री उपस्थित नसल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजित पवारांच्या मुद्द्याला उत्तर दिलं. मंत्री विखे पाटील म्हणाले की, राज्य सरकारने कॉपीमुक्त अभियान सुरु केलेलं आहे. तरीही असे प्रकार घडत असतील तर गंभीर बाब आहे. आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत या प्रकरणी योग्य ती कारवाई करु, असं आश्वासन त्यांनी दिलं.
बोर्डानेदेखील पेपरफुटीला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. सिंदेखडराजा येथे हा प्रकार घडल्याचं सांगितलं जातंय. विद्यार्थ्यांकडे खरंच पेपर पोहोचला होता का? याबाबत यंत्रणा तपास करत आहे.