
Ajit Pawar: 'शेवटी चुका माणसांकडूनच होत असतात', 'त्या' 40-45 आमदारांची घरवापसी? पवार म्हणाले...
मुंबईः मागच्या काही काळामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीतले ४० ते ४५ आमदार भाजपमध्ये गेले आहेत. नरेंद्र मोदींचा करिष्मा आणि लाटेचा महिमा बघून ते लोक गेले खरे परंतु आज अनेकांना चुका सुधारायच्या आहेत. असं म्हणत अजित पवार यांनी एक प्रकारे गेलेल्या आमदारांना घरवापसीचं आवाहन केलं आहे.
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने विजय प्राप्त केल्यानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. भाजपचा उधळलेला वारु आपण रोखू शकतो, असं आश्वस्त केलं जात आहे.
हेही वाचाः परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर
अजित पवार म्हणाले की, भाजपच्या बालेकिल्ल्यात झालेलं परिवर्तन राजकीय बदलांचे संकेत आहेत. राजकारणामध्ये कालचा शत्रू आजचा मित्र असतो तर कालचा मित्र उद्याचा शत्रू असतो.
'२०१४ पासून मोदींच्या करिष्म्यावर प्रभावित होवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले ४० ते ४५ आमदार भाजपमध्ये गेले. शेवटी चुका ह्या माणसांकडूनच होतात. त्या सुधारल्याही जावू शकतात. मतदारसंघाचा विकास करायचा असतो म्हणून आमदार पक्ष सोडतो.'
'पूर्वीसारखं विचारधारेला चिटकून विरोधात राहण्याची मानसिकता उरली नाही. त्यामुळे झालेल्या चुका सुधारु शकतात.' अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी एक प्रकारे भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना घरवापसीचे संकेत दिले आहेत.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करुन महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांनी विजच खेचून आणला. मागच्या २८ वर्षांपासून कसबा हा भाजपचा गड होता. तिथल्या मतदारांचं एकगठ्ठा मतदान भाजपला होत आलेलं आहे. परंतु यावेळी मतदारांनी भाजपला नाकारलं. त्यामुळे मरगळ आलेल्या विरोधी पक्षामध्ये उत्साह संचारला आहे. याच उत्साहाच्या बळावर आरुढ व्हायची युक्ती विरोधक करीत असल्याचं दिसून येतंय.