मुंबई - ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली 99 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूर येथे 22 फेब्रुवारीला सुरू होणार आहे. भरत जाधव याच्या अभिनयाने गाजलेले "पुन्हा सही रे सही' हे नाटक संमेलनाचे खास आकर्षण असेल.
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते होणार आहे. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वागताध्यक्ष म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहतील. उद्घाटनानंतर 25 फेब्रुवारीच्या पहाटेपर्यंत विविध कार्यक्रम होणार आहेत. मराठी नाट्य संमेलनात ज्येष्ठ दिग्दर्शक वामन केंद्रे, संगीत नाटक अकादमीचा विशेष पुरस्कार मिळालेले लेखक अभिराम भडकमकर, ज्येष्ठ लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे आणि अन्य नाट्यकर्मींचा सत्कार केला जाणार आहे.
विकास आमटे यांच्या संकल्पनेतून साकारलेला आनंदवनातील कलाकारांच्या "स्वरानंद' वाद्यवृंदाचा कार्यक्रम, ज्येष्ठ गायिका देवकी पंडित यांचा सुफी संगीतावर आधारित "मुक्ती' कार्यक्रमही संमेलनात सादर होईल. बाल कलाकारांचे "गीत रामायण' आणि प्रमोद खेडेकर यांच्या लोकनाट्यांचा रसिकांना आस्वाद घेता येणार आहे.
|