कोण होणार यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष?

सुशांत सांगवे
बुधवार, 24 जुलै 2019

पुण्या-मुंबईची भूमिका महत्त्वाची
गतवर्षी संमेलन विदर्भात आणि साहित्य महामंडळही विदर्भातच असताना पुण्यातील कवयित्री डॉ. अरुणा ढेरे या अध्यक्ष झाल्या. त्यांच्या नावाला महाराष्ट्र साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे संमेलनाध्यक्ष निवडप्रक्रियेत पुण्या-मुंबईची भूमिका यंदाही महत्त्वाची ठरण्याची शक्‍यता आहे. या पार्श्वभूमीवर ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, मुंबई मराठी साहित्य संघाच्या अध्यक्षा उषा तांबे म्हणाल्या, ‘‘कार्यकारी मंडळाची बैठक घेऊन संमेलनाध्यक्षपदासाठी योग्य ते नाव लवकरच सुचवू. साहित्य महामंडळाकडे पाठविले जाणारे नाव पदाला प्रतिष्ठा देणारेच असेल.’’ दरम्यान, विदर्भ साहित्य संघ यंदाही साहित्यिक रवींद्र शोभणे यांचेच नाव महामंडळाकडे पाठविण्याची शक्‍यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लातूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादेत होणार, हे निश्‍चित झाल्यानंतर आता संमेलनाध्यक्ष कोण, याबाबात साहित्यवर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या पदासाठी निवृत्त न्यायाधीश नरेंद्र चपळगावकर, कविवर्य ना. धों. महानोर, साहित्यिक रा. रं. बोराडे, सुधीर रसाळ या साहित्यिकांची नावे चर्चेत आहेत. त्यात आणखी काही नावांची भर पडणार का, संमेलन मराठवाड्यात होणार असल्याने अध्यक्षही मराठवाड्यातील असेल का, याबाबत उत्सुकता आहे.

साहित्य महामंडळाने आपल्या घटनेत बदल करून अध्यक्षपदाची निवडणूक बंद केली आहे. ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांना सन्मानाने अध्यक्षपद मिळावे म्हणून मागील वर्षी हा बदल करण्यात आला आहे. संमेलनाध्यक्षपदासाठी महामंडळाच्या संलग्न, समाविष्ट संस्थांकडून नावे मागवली जातात. संबंधित संस्थांनी एक ते तीन नावे पाठविणे आवश्‍यक आहे. चार नावे पाठवली, तर चारही बाद होतात. त्यामुळे संस्थांना कमाल तीनच नावे पाठवावी लागतील.

त्यानुसार मराठवाडा साहित्य परिषद (औरंगाबाद), महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), विदर्भ साहित्य संघ (नागपूर), मुंबई साहित्य संघ (मुंबई) या संस्था कोणकोणती नावे महामंडळाकडे पाठविणार, याकडे लक्ष लागले आहे.

साहित्य संस्थांकडून आलेली नावे साहित्य महामंडळाच्या बैठकीत ठेवली जातील. एकमताने किंवा बहुमताने संमेलनाध्यक्ष जाहीर होईल. ऑक्‍टोबरअखेरीस या नावाची घोषणा होईल.
- कौतिकराव ठाले-पाटील, अध्यक्ष, साहित्य महामंडळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan Chairman