केवळ सत्कारांचा घाट, निरोपाचा सुशेगात थाट

sahitya-sammelan
sahitya-sammelan

साहित्य संमेलनाच्या समारोपाचा कार्यक्रम सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुरू झाला. या कार्यक्रमाच्या सुरवातीला आगरी युथ फोरम संस्थेच्या वतीने सगळ्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. त्यानंतर डोंबिवली शहरातील मान्यवर संस्थांनी महामंडळ आणि मंत्र्यांचा सत्कार केला. अर्ध्या तासात हा सत्कारसोहळा संपेल, असे वाटत असताना सुमारे एक तास हा कार्यक्रम सुरू होता. त्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने सत्कार सुरू करण्यात आला. त्यांनी आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांचा सपत्नीक सत्कार केलाच शिवाय फोरमच्या सर्व सदस्यांचाही सत्कार सुरू झाला. उपस्थित साहित्यरसिक त्यामुळे व्यथित झाले होते. सत्काराचा कार्यक्रम कधी आटोपणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सेल्फी आणि खाऊ
साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी गर्दी आहे म्हणण्याइतपत रसिकांची गर्दी नव्हती. मात्र ही सगळी गर्दी ग्रंथग्रामच्या पुस्तक प्रदर्शनाकडे वळत होती; तर बहुसंख्य मंडळींनी संमेलनाच्या प्रवेशद्वारावर सेल्फी काढून खाऊच्या स्टॉलवर जाणे पसंत केले. साहित्याच्या मेजवानीसाठी आलेल्या अनेकांनी वेगळ्याच मेजवानीला पसंती दिल्याची चर्चा सुरू होती. सायंकाळी ग्रंथग्रामला गर्दी वाढली. 

आमदारांची लाखाची गोष्ट
संमेलनाच्या पुस्तक विक्रीला पहिले दोन दिवस म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सगळ्याच प्रकाशन संस्थांकडून काळजी व्यक्त केली जात होती. प्रकाशन संस्थांना मदतीचा हात देण्यासाठी डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी एक लाखाच्या पुस्तक खरेदीची घोषणा करून टाकली.

साहित्याची आवड असल्याने डोंबिवलीच्या साहित्य संमेलनासाठी आलो आहे. येथे अनेक नामवंत लेखकांच्या भेटी झाल्या आणि प्रत्यक्षपणे त्यांचे विचार ऐकून घेतले.नवोदित कवींची देखील या निमित्ताने मैत्री झाली.
- हनुमंत पडवळे, उस्मानाबाद

देशभरातल्या आक्रोशामुळे कविता हरवली - मेधा पाटकर
देशभरात होत असलेल्या आक्रोशापर्यंत पोचण्यात कमी पडतोय, भावानात्मक प्रकटीकरणासाठी वेळच मिळत नाही, यामुळे आयुष्यातली कविता हरवली आहे, अशी खंत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केली. नव्वदाव्या साहित्य संमेलनात ‘प्रतिभायन’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. 

पॉप्युलर प्रकाशनचे रामदास भटकळ, लेखक अच्युत गोडबोले यांच्यासह मेधा पाटकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम ‘प्रतिभायन’ या अंतर्गत पार पडला. वंदना बोकील कुलकर्णी यांनी या तिघांना बोलते केले. बालपणातच समाजातील वंचित घटकांसाठी काम करण्याचे संस्कार मिळाल्याचे मेधा पाटकर यांनी आपले बालपण उलगडताना सांगितले. या गटासाठी काम करताना त्यांच्याकडून बरेच शिकायला मिळाले. चळवळीतील गाणी कविता बरचं काही सांगून जातात, कवितेद्वारे मनातले भाव बाहेर पडतात मात्र कवितांची पाने जपून ठेवू शकले नाही, असेही पाटकर एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाल्या. कवी कवियत्री यांचा आंदोलनातील सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी मान्य केले. 

समांतर रंगभूमी ही चळवळ - सोनटक्के
चांगली कला नेहमीच वेगळे समाजकार्य करत असते. व्यावसायिक रंगभूमीकडून कलेची अपेक्षा करणे चुकीचे आहे. कारण, तो व्यवसाय आहे; मात्र समांतर रंगभूमी ही चळवळ आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के यांनी व्यक्त केले. 
शं. ना. नवरे सभामंडपात कमलाकर सोनटक्के व कांचन सोनटक्के यांची मुलाखत घेण्यात आली. अनेक थोर कलावंतांनाही नाट्य प्रशिक्षण देऊन नाटक होऊ शकते, हे मान्य नव्हते, असे या वेळी कमलाकर सोनटक्के म्हणाले. कांचन सोनटक्के म्हणाल्या, की बालनाट्य प्रशिक्षण ही समाजाची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com