हार्दिक पटेलचे "चलो अकोला'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

अकोला - शेतकरी, बेरोजगारांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेता हार्दिक पटेल 23 मार्च रोजी अकोल्यात येणार आहेत. हार्दिक यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या सभेबाबत राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता आहे. ऐवढेच नव्हे तर हार्दिकसुद्धा या सभेबाबत कमालीचे उत्सुक आहे. त्यांनी या सभेबाबत 13 मार्च रोजी "सकाळ'मध्ये प्रकाशित केलेले वृत्त ट्‌विट करून "चलो अकोला' असा नारा दिला आहे. या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहनही हार्दिक यांनी केले आहे.

शेतकरी व बेरोजगार युवकांच्या प्रश्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधण्यासाठी हार्दिक यांची जाहीर सभा 23 मार्च रोजी अकोल्यातील स्वराज्य भवन येथे सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आली आहे. हार्दिक यांच्या या "एल्गार मेळाव्या'ची व महाराष्ट्रातील पहिल्या जाहीर सभेबाबत कमालीची उत्सुकता दिसून येत आहे. राज्यातील पहिल्याच सभेत हार्दिक नेमके काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हार्दिक यांचे विचार एकण्यासाठी महाराष्ट्रातील त्यांचे चाहतेही उत्सुक दिसून येतात. विदर्भ यूथ फोरमने हा "एल्गार मेळावा' आयोजित केला आहे.

शेट्टी, कपिल पाटीलही येणार
अकोल्यातील या सभेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी आणि संयुक्त जनता दलाच्या शरद यादव गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार कपिल पाटील, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, तर स्वागताध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे विदर्भ समन्वयक संग्राम गावंडे राहणार आहेत.

Web Title: akola maharashtra news hardik patel chalo akola