'ब्लू व्हेल'च्या जाळ्यातून अकोल्यात युवक बचावला

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

फाशीचं गूढ "ब्लू व्हेल' की... 

फाशी घेण्यापूर्वी युवकाच्या हातात मोबाईल होता. तो गेम खेळत होता की चॅटिंग करत होता हे तो शुद्धीवर आल्यावरच कळेल; परंतु त्याला रुग्णालयात दाखल केले तेव्हा, "ब्लू व्हेल' या आभासी खेळाच्या नादात मुलानं फाशी घेतल्याची चर्चा आहे. 

अकोला : मोबाईलमधील "ब्लू व्हेल' या गेमच्या आभासी विश्वात हरविलेल्या तरुणाने फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. आजी आणि आजोबांच्या सतर्कतेमुळे त्या युवकाला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. "ब्लू व्हेल' खेळाच्या शेवटच्या टप्प्यात असताना त्याने हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. दरम्यान, पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविल्यानंतरच खरे सत्य समोर येईल. 

जठारपेठ भागातील या तरुणाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी त्याचे आईवडील कौटुंबिक कारणास्तव नागपूरला गेले होते. मोबाईलमध्ये गुंग असलेल्या नातवाने कुत्र्याच्या गळ्यातील पट्ट्याने स्वतःला गळफास लावल्याचे दृश्‍य आजी आजोबांच्या नजरेस पडले. त्यानंतर त्यांनी त्याला कसेतरी मृत्यूच्या जाळ्यातून सोडवले आणि वेळ न घालवता त्यांनी त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

Web Title: Akola Youth escaped from blue whale