आळंदीच्या दर्शनबारीबाबत आज निकाल

आळंदीच्या दर्शनबारीबाबत आज निकाल

आळंदी - आळंदीतील दर्शनबारीचे आरक्षण कायम ठेवून त्याच जागेवर ती उभारावी, या नागरिकांच्या मागणीवर आज अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्यापुढे सुनावणी झाली. याबाबत निर्णयाचा आदेश उद्या (ता. ११) काढण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीच्या दर्शनबारीबाबतच्या निकालाची उत्कंठा कायम आहे. 

आळंदीतील इंद्रायणीकाठच्या दर्शनबारीच्या जागेचे आरक्षण मुख्यमंत्रीस्तरावर हटविण्यात आले. आरक्षण पूर्ववत ठेवावे आणि आरक्षण हटविण्यासाठी चुकीचा अहवाल सादर करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी वारी नियोजनाच्या पुण्यातील बैठकीत माजी नगरसेवक डी. डी. भोसले, रामदास दाभाडे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, संदीप कायस्थ यांनी केली होती. त्यानुसार पालकमंत्र्यांच्या बैठकीत ठरल्यानुसार आज अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्याकडे दर्शनबारीच्या जागेबाबत सुनावणी घेण्यात आली. या वेळी तक्रारदार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी समीर भूमकर, बांधकाम विभागप्रमुख संघपाल गायकवाड यांची उपस्थिती होती.

तक्रारदार भोसले यांनी सांगितले, की दर्शनबारीचा विषय महत्त्वाचा असून, दर्शनबारीच्या नियोजित जागेत सध्या सुरू असलेले बेकायदा बांधकाम नगरपालिकेने तत्काळ पाडावे. पूरनियंत्रण रेषेत कोणतीही परवानगी न घेता बांधकाम सुरू असूनही मुख्याधिकारी कारवाई करीत नाहीत. दर्शनबारीचे आरक्षण हटविण्यासाठी खोटा अहवाल देऊन मुख्याधिकाऱ्यांनी चूक केली असून, त्यांच्यावर कारवाई व्हावी. तसेच, राज्य सरकारने सध्या इंद्रायणी नदीत वारकऱ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून ‘स्काय वॉक’ बांधला, सुलभ शौचालय बांधले. दर्शनबारीच होणार नसेल, तर सर्व खर्च वाया जाईल. सरकार आणि देवस्थानकडे दुसरी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे आहे त्याच जागेवर पुन्हा आरक्षण टाकून दर्शनबारी उभारावी. तसेच, शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे आणि बेकायदा बांधकामावर मुख्याधिकाऱ्यांनी कारवाई केली नसल्याचे भोसले यांनी सांगितले.

‘अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय मान्य’
बांधकाम विभागप्रमुख संघपाल गायकवाड यांनी सांगितले, की आज दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतले. मूळ जागा मालकाने संरक्षक भिंत बांधली. याबाबत नगरपालिकेच्या वतीने म्हणणे मांडले असून, उद्यापर्यंत अतिरिक्त जिल्हाधिकारी निर्णय देतील, त्या आदेशाचे पालन नगरपालिका करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com