तिरंगी लढतीत विजयासाठी सर्वांचे प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016

पुणे - विधान परिषद निवडणुकीत पुण्यातील जागेवर विजय मिळावा, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तिन्ही उमेदवारांचा मतदारांच्या भेटीचा दुसरा टप्पाही पूर्ण झाला असून, आता शेवटच्या दोन दिवसांचे नियोजन सुरू झाले. या निवडणुकीसाठी शनिवारी (ता. 19) शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ केंद्रांवर मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीतील मतदानात भाग न घेण्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. 

पुणे - विधान परिषद निवडणुकीत पुण्यातील जागेवर विजय मिळावा, यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तिन्ही उमेदवारांचा मतदारांच्या भेटीचा दुसरा टप्पाही पूर्ण झाला असून, आता शेवटच्या दोन दिवसांचे नियोजन सुरू झाले. या निवडणुकीसाठी शनिवारी (ता. 19) शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये नऊ केंद्रांवर मतदान होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीतील मतदानात भाग न घेण्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे विद्यमान आमदार अनिल भोसले, भारतीय जनता पक्षातर्फे नगरसेवक अशोक येनपुरे, तर कॉंग्रेसतर्फे जिल्हाध्यक्ष संजय जगताप हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, देहूरोड, पुणे आणि खडकी कॅंटोन्मेंट बोर्ड, नगरपालिका, नगर परिषदांचे एकूण 710 सदस्य मतदान करणार आहेत. शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बहुमत असले तरी कॉंग्रेसबरोबर या निवडणुकीत त्यांची आघाडी झालेली नाही, तर भाजपने नेटाने प्रचार केला असून त्याचे मतदानात परिवर्तन होणार का, याबद्दल राजकीय वर्तुळात औत्सुक्‍य आहे. पालकमंत्री गिरीश बापट, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे स्वतः पंधरा दिवसांपासून प्रचारात सहभागी झाले आहेत. येनपुरे हे बापट यांचे निकटवर्तीय आहेत, तर पवार यांच्यासाठी पुण्यातील जागा प्रतिष्ठेची आहे. कॉंग्रेसनेही स्वतःची मते शाबूत ठेवण्यावर भर दिला आहे. त्यामुळे तिरंगी लढतीच्या निकालाकडे तिन्ही पक्षाच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे. 

भोसले यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील आमदारांनी; तसेच नेत्यांनी भाग घेतला आहे. तसेच महापौर प्रशांत जगताप आणि जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठेही सक्रिय आहेत. अजित पवार यांनी सर्व तालुक्‍यांतील सर्व सदस्य मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना भोसले यांना मतदान करण्याचा आदेश दिला आहे, तर सुमारे 70 टक्के मतदारांच्या घरांपर्यंत पोचून संपर्क साधल्याचे भोसले यांनी नमूद केले. 

येनपुरे यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री बापट; तसेच शिवसेना, रिपब्लिकन पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या नेत्यांसह शहर, जिल्ह्यातील आमदार सहभागी झाले आहेत. त्याशिवाय पक्षाच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारीही तालुक्‍यांतील मतदारांच्या भेटी घेत आहेत. गेल्या दहा दिवसांत पहिल्या फेरीत 700 मतदारांच्या भेटी घेतल्या आहेत, असे येनपुरे यांनी सांगितले. तसेच दुसऱ्या फेरीत पक्षाचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी मतदारांशी संपर्क साधत असल्याचे त्यांनी सांगितले. 

जगताप यांनीही मतदारांशी संपर्क साधण्याच्या दोन फेऱ्या पूर्ण केल्या आहेत. जगताप यांच्या प्रचारासाठी शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील कॉंग्रेसचे आजी-माजी आमदार, पक्षाचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. कॉंग्रेस भवनमध्ये गुरुवारी शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवडमधील पक्षाच्या मतदारांची बैठक झाली. त्या प्रसंगी "कॉंग्रेसचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपल्या उमेदवारालाच मतदान करावे,' असे आवाहन शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केले. 

नऊ केंद्रांवर मतदान 

विधान परिषद निवडणुकीसाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिकेत संबंधित नगरसेवकांचे मतदान होणार आहे. तसेच पुण्यातील जिल्हा परिषद इमारतीमध्येही केंद्र आहे. त्याशिवाय सासवड, बारामती, भोर, जुन्नर, खेड आणि तळेगावात शनिवारी (ता. 19) सकाळी आठ ते दुपारी चारच्या दरम्यान मतदान होईल. मतमोजणी सोमवारी (ता.21) होईल.

Web Title: All efforts to win