तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्वच आरोपींची निर्दोष मुक्तता

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 31 डिसेंबर 2018

कोट्यवधी रुपयांच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्वच्या सर्व 7 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने आज (ता.31) हा निकाल दिला. जिल्हा न्यायाधीशांकडे या प्रकरणाची गेल्या काही महिन्यांपासून नियमित सुनावणी सुरू होती. देशभर गाजलेल्या या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा मृत्यू झाला आहे. न्यायालयाने याप्रकरणी 49 जणांच्या साक्षी नोंदवल्या. अखेर भक्कम पुराव्याअभावी या सर्वांची मुक्तता करण्यात आल्याचे न्यायाधीशांनी निकाल देताना सांगितले.

नाशिक- कोट्यवधी रुपयांच्या तेलगी स्टॅम्प घोटाळ्यातील सर्वच्या सर्व 7 आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नाशिक जिल्हा न्यायालयाने आज (ता.31) हा निकाल दिला. जिल्हा न्यायाधीशांकडे या प्रकरणाची गेल्या काही महिन्यांपासून नियमित सुनावणी सुरू होती. देशभर गाजलेल्या या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार अब्दुल करीम तेलगी याचा मृत्यू झाला आहे. न्यायालयाने याप्रकरणी 49 जणांच्या साक्षी नोंदवल्या. अखेर भक्कम पुराव्याअभावी या सर्वांची मुक्तता करण्यात आल्याचे न्यायाधीशांनी निकाल देताना सांगितले.

नाशिक येथील प्रतिभुती मुद्रालणायातुन नादुरुस्त झालेले यंत्र अधिकार्‍यांना हाताशी धरुन खरेदी केले व त्याआधारे स्टँप छापून घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सीबीआयने 25 ऑगस्ट 2004मध्ये या प्रकरणात तेलगीसह सहा आरोपींविरुद्ध कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात नाशिकरोड येथील इंडियन सिक्युरिटी प्रेसमधून स्टॅम्प छापल्यानंतर ते देशभर रेल्वेने पाठवले जात असत. तेलगीने रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संगनमत करून हा स्टॅम्प चोरीचा प्रकार सुरू केला होता, असा आरोप त्याच्यावर होता. यातूनच नंतर तेलगीने पुढे 32 हजार कोटींचा घोटाळा केला. रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी या प्रकरणात आरोपी होते. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

नाशिकरोडच्या प्रतिभुती मुद्रणालयातील मुद्रांकाची चोरी करून ख्याती मिळविलेल्या अब्दुल करीम तेलगी याने मुद्रणालयातील अधिकाऱ्यांनाही हाताशी धरल्याची बाब तपासाअंती निष्पन्न झाल्याने मुद्रणालय चर्चेत आले होते. प्रतिभुती मुद्रणालयाने काही जुन्या मशिनरी त्यावेळी विक्रीस काढल्या होत्या. मुळात देशाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत असलेल्या मशिनरी विक्री करतांना त्या सुट्या भागात विक्री केल्या जाव्यात असे अपेक्षित असताना तत्कालीन महाव्यवस्थापक गंगाप्रसाद यांनी संपुर्ण मशिनरी एकाच वेळी विक्रीस काढली व सदरची मशिनरी अब्दुल करीम तेलगी याने विकत घेतल्याचे त्यावेळी उघडकीस आले. गंगाप्रसाद यांच्यावरही तेलगीला मदत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे प्रतिभुती मुद्रणालय वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.

अब्दुल करीम तेलगी याच्यावर देशभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर त्याला काही गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेच्या शिक्षाही सुनावण्यात आल्या. नाशिकमध्ये तेलगीसह सात आरोपींवर दाखल असलेल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र केंदीय अन्वेषण विभागाने नाशिकच्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आले. परंतु जो पर्यंत तेलगी न्यायालयात हजर होत नाही तो पर्यंत या खटल्याचे काम पुढे सरकणार नसल्याने सीबीआयचे विशेष वकील विश्वास पारख यांनी सातत्याने त्यासाठी पाठपुरावा केला. तेलगीला एड्स झाल्यामुळे त्याला न्यायालयीन सुनावणीत गैरहजर राहण्याची अनुमती मिळावी यासाठी त्याच्यावतीने खुप प्रयत्न करण्यात आले. परंतु पारख यांनी चिकाटीने सीबीआयच्या मागे लागून कधी हैद्राबाद तर कधी बेंगलोर न्यायालयात पाठपुरावा करून अखेर 2013 मध्ये अब्दुल करीम तेलगी याच्या नावाने वॉरंट घेतले अखेर पोलिस बंदोबस्तात तेलगी नाशिकच्या न्यायालयात हजर झाला. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात त्याचे तुरूंगातच निधन झाले होते. त्याच्या अनुपस्थितीत या खटल्याचे कामकाज चालले होते, त्यात तो मृत्युपश्चात निर्दोष सुटला.

Web Title: All seven accused in the Telagi stamp scam get acquitted by court