युतीच्या चर्चेची वाटचाल विघटनाकडे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 21 जानेवारी 2017

मुंबई - विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या काही महापालिका निवडणुकांत एकमेकांवर केलेल्या जखमांच्या कटू आठवणी पुन्हा नकोत, म्हणून मुंबई महापालिकेसाठी जागावाटपाच्या चर्चेच्या काही फेऱ्या पार पाडणारी भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपाची वाटचाल उत्तरोत्तर विघटनाच्या दिशेने सुरू झाली आहे.

मुंबई - विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या काही महापालिका निवडणुकांत एकमेकांवर केलेल्या जखमांच्या कटू आठवणी पुन्हा नकोत, म्हणून मुंबई महापालिकेसाठी जागावाटपाच्या चर्चेच्या काही फेऱ्या पार पाडणारी भाजप-शिवसेना युतीच्या जागावाटपाची वाटचाल उत्तरोत्तर विघटनाच्या दिशेने सुरू झाली आहे.

मुंबई महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या वतीने जागावाटपाच्या चर्चेला सुरवात झाली आहे. भाजपकडून मंत्री विनोद तावडे, मंत्री प्रकाश महेता, आमदार आशिष शेलार, तर शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब आणि रवींद्र मिर्लेकर यांच्यात बैठकांचे सत्र पार पडले. दोन बैठका झाल्या. यात भाजपने आमदारांची संख्या, वाढलेले बळ, पारदर्शीपणा आदी मुद्दे पुढे करत पन्नास टक्‍के जागांवर दावा केला. शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक, शिवसेनेची ताकद असलेल्या भागांतील जागांवर दावा केला. त्यातच मुंबईतील भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी सातत्याने मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणे सुरू ठेवले. तसेच मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीही शिवसेनेला लक्ष्य केले आहे. त्यामुळे शिवसेनेकडून जागावाटपाच्या चर्चेत सहभागी झालेले नेते अनिल देसाई आणि अनिल परब यांनी बेताल वक्‍तव्य करणाऱ्या या नेत्यांना एकतर भाजपने अर्थात मुख्यमंत्र्यांनी आवरावे, त्यानंतर आपली भूमिका व्यक्‍त करावी, अशी मागणी केली. त्यामुळे दोन बैठका झाल्यानंतर जागावाटपाचे घोडे अडले आहे. त्यातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन मुंबईकरांना मालमत्ता करात सवलत देण्याची घोषणा करत भाजपावर कुरघोडी केली. त्यामुळे जागावाटपाची चर्चा थंडावली असून, तणावाचे वातावरण निर्माण झाले. यातच विनोद तावडे यांनी म्हटले आहे, की आम्ही म्हणजे भाजप युती करण्यास आशावादी आहोत; मात्र शिवसेनेने चर्चेसाठी वरिष्ठ नेते पाठवले. आम्ही युतीसाठी गंभीर आहोत. आम्ही मुंबई महापालिकेतील भ्रष्ट ठेकेदाराविषयी बोललो आहोत. तावडेंच्या वक्तव्याने वातावरण अधिकच चिघळले आहे. यातच शिवसेनेने जागावाटपाबाबत 21 जानेवारी ही अंतिम तारीख ठरवली आहे. त्यामुळे आता चर्चा करणाऱ्या नेत्यांच्या हाती जागावाटपाची अथवा युतीची सूत्रे राहिली नसून, मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यावर युतीची शक्‍यता अवलंबून आहे. त्यामुळे तूर्तास युतीच्या चर्चेची वाटचाल विघटनाच्या दिशेने सुरू आहे.

Web Title: Alliance of discussion moving disturb