युतीत जालन्यापासून कोकणापर्यंत धुसफूस; कसे समजवणार?

युतीत जालन्यापासून कोकणापर्यंत धुसफूस; कसे समजवणार?

मुंबई : शिवसेना-भाजप युतीच्या सामंजस्य करारानंतर कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे आणि बंडाचे झेंडे उभारले जाऊ नयेत यासाठी विधानसभेसाठी "50-50'चा फॉर्म्युला अगोदरच जाहीर करण्याची काळजी घेण्यात आली आहे. मात्र तरीही जालन्यापासून कोकणापर्यंत धुसफूस सुरू झाली आहे. शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांपासून भाजपच्या प्रमोद जठारांनीही युतीबाबत उघड नाराजी व्यक्‍त करत वेगळी चूल मांडण्याचे सूतोवाच केले. 

शिवसेना-भाजप सरकारच्या काळात एकत्र संसार करतानाही एकमेकांवर शरसंधान करण्याचे कुठलेच निमित्त पक्षाच्या नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत कोणीच सोडले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवताना स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनीही उणीदुणी काढण्याची संधी सोडली नव्हती. त्यातूनच युतीनंतरच्या काळात दोन्ही पक्षांना वाढण्यासाठी मिळालेल्या जागेत तयार झालेल्या कार्यकर्त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा देखील वाढल्या आहेत. त्याचे परिणाम आगामी निवडणुकांमध्ये ठळकपणे दिसण्याची शक्‍यता आहे. 

खोतकरांची तयारी 

मंत्रिमंडळातील शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून लोकसभेची निवडणूक भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लढविण्यासाठी जंगी तयारी केली आहे. दानवे आणि खोतकर यांचा स्थानिक पातळीवरील राजकारणात सरकारच्या अनेक योजनादेखील खोळंबून पडल्या होत्या. मात्र आता युती झाल्याने अर्थात खोतकर यांना तलवार म्यान करावी लागण्याची चिन्हं दिसू लागली आहेत; पण खोतकर यांनी अजून रणांगणातून माघार घेतली नसल्याचे सूचित करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे; तसेच इतर पक्षांशी मैत्रीचे संबंध असल्याचे सांगत नाराजी व्यक्‍त केली आहे. 

जठार नाणारच्या बाजूने 

भाजपचे सिंधुदुर्गातील जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी तर मोदी सरकारने आणलेल्या नाणार प्रकल्पाच्या समर्थनार्थ निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी दाखवली आहे. "सकाळ'शी बोलताना त्यांनी सांगितले, की कोकणामध्ये प्रकल्पसमर्थक आणि प्रकल्पविरोधक असे दोन गट आहेत. संभाव्य उमेदवार नीलेश राणे आणि विनायक राऊत नाणारच्या विरोधात असलेले उमेदवार आहेत. हे दोन्ही उमेदवार प्रकल्पांच्या विरोधातले आहेत.

जनतेला प्रकल्प हवेत, राजकारण्यांना नको. प्रकल्पसमर्थक आणि प्रकल्पविरोधकांमध्ये सामना व्हायला हवा. प्रकल्प मोदी सरकारने आणले असल्याने प्रकल्पाच्या समर्थनासाठी मी उभा राहणार आहे. भाजपची विचारधारा मी सोडणार नाही. मोदींच्या विचारासाठी काम करण्यासाठी माझा राजकीय बळी गेला तरी चालेल. नाणार प्रकल्पामुळे कोकणात दीड ते दोन लाख लोकांना रोजगार मिळणार आहेत. प्रकल्पांचे समर्थन आणि कोकणाच्या विकासासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पालघरमध्ये राजीनामे 

पालघरची जागा शिवसेनेला सोडण्यावरून भाजपमधली अंतर्गत नाराजी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन जाहीर केली आहे. पालघर हा भाजपचा गड असल्याने तो शिवसेनेला देण्यास कार्यकर्त्यांचा विरोध आहे. याविषयी पालघरचे भाजप जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांनी कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी वरिष्ठांच्या कानावर घालणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त केली. ते म्हणाले, की भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा मतदारसंघ चांगला बांधलेला आहे. त्यामुळेच शिवसेनेला हा मतदारसंघ जाऊ नये, असे कार्यकर्त्यांना वाटते. गेल्या दोन दिवसांत पालघरमधील सर्व तालुका मंडळ अध्यक्षांनी राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. 

आठवलेंचा हट्ट 

दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघात युतीमध्ये थेट नाराजी नाही. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेने रिपब्लिकन पक्षासाठी सोडावा, यासाठी रामदास आठवले यांनी भाजपकडे हट्‌ट धरला आहे. मात्र ही जागा शिवसेनेकडे असल्याने ही जागा आपल्याला सोडल्यास राज्यभरातली दलित मते युतीकडे येतील, असा दावा त्यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com